लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून(२ एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. याशिवाय श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होत आहे. त्यामुळे करोनामुळं मागील काही काळापासून बंद असलेलं विठुरायाचं थेट दर्शनही आता भाविकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिलेली आहे.

करोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले. तर, दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. मात्र करोना संसर्गामुळे सरकारने अनेक नियम लागू केले होते. श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते, पदस्पर्श दर्शन बंदच होते. श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांकडून केली जात होती.

आता करोनाची तिसरी लाट ओसरली असून, सरकारने निर्बंध देखील हटवले आहेत. त्यामुळे आजपासून श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे.