दोन दिवसातील पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उत्पादनवाढीची दाट शक्यता दर्शवित आहे, पण त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणार काय, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्य़ाच्या वार्षिक सरासरीच्या ९० टक्के प्रमाणात पडलेला पाऊस, तसेच या पिकांना गत दोन दिवसातील पावसाने मिळालेली संजीवनी शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लकेर उमटवून गेली. गतवर्षीच्या तुलनेत दीडपट उत्पादन होण्याची खात्री कृषी विभागातील वरिष्ठ देत आहेत. गत चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा निश्चितच वाढ होण्याचे संकेत प्रारंभिक आकडेवारीतून मिळतात. जिल्ह्य़ात यंदा एकूण पेऱ्यातच वाढ झाली. सरासरी ४ लाख १० वर होणारी पेरणी सव्वा चार लाख हेक्टरवर पोहोचली आहे. सोयाबीनचा पेरा कमी, तर कडधान्याचा पेरा वाढलेला. तूर ५५ वरून ७५ हजार हेक्टरवर, कापूस १ लाख ८५ हजारऐवजी २ लाख ३४ हजार हेक्टर, तसेच मूग व उडदाच्या लागवडीत झालेली तिप्पट वाढ शेतकऱ्यांसाठी आश्वासक आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने किडीला आळा व सोयाबीनच्या शेंगा भरण्यास मदत मिळेल. तूर, उडीद व मूगाचेही उत्पादन सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता कृषी अधिकारी सांगतात. गतवर्षी १ लाख ८५ हजार ८९४ क्विंटल कापूस, ५३ हजार २८७ क्विंटल सोयाबीन, २५ हजार ७९३ क्विंटल तूर, २७ हजार ७४४ क्विंटल गहू, १२९ क्विंटल मूग, १३८ क्विंटल उडीद, असे उत्पादन झाले होते. म्हणजे, हेक्टरी ६-७ ऐवजी ९ ते १० क्विंटल कापूस यंदा होण्याची शक्यता आहे. तूर, सोयाबीन व मूग या पिकांची हेक्टरी सरासरी दुप्पट गृहित धरली जाते.

उत्पादन समाधानकारक राहणार, याविषयी दुमत नाही. कृषिखात्यातील वरिष्ठ म्हणतात, हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सुगीचे राहणार. यंदा हमीभावाचे महत्व कळेल. म्हणजे, बाजारात अधिक उत्पादन आले म्हणून तोटा होण्याचे अर्थशास्त्र हमीभावामुळे लागू पडणार नाही, असे समीकरण मांडले जाते. हमीभावाने जरी माल विकला गेला तरी शेतकऱ्यांचा फोयदाच होईल. एकरी १५ हजार रुपये लागवड खर्च केल्यावर ३२ ते ३५ हजाराचे उत्पन्न समाधानकारक म्हणता येईल, असा कृषिखात्याचा होरा आहे. गतवर्षी अतिपावसामुळे मशागतीअभावी पिके वाहून गेली. किडींचे प्रमाण अधिक होते. यंदा असे तडाखे बसले नाहीत, पण शेतकऱ्यांनाही शेतमाल विक्रीचे व्यवस्थापन साधले पाहिजे, असाही सावधगिरीचा इशारा देण्यात येतो, पण शासकीय पातळीवरचा चांगल्या उत्पादनाचा व परिणामी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा होरा शेतकरी नेते फे टाळला आहे.

सुगीचे दिवस येतील म्हणणे धाडसाचे -जावंधिया

उत्पादन वाढणार यात शंकाच नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही देतांना शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणतात की, पण त्यामुळे उत्पन्न वाढेलच, असे नाही. गत तीन-चार वर्षांत हमीभावापेक्षा सोयाबीनला बाजारभाव चांगला मिळाला होता. यंदा हे भाव आताच उतरलेले आहेत. सोयाबीनचा बाजारभाव हमीभावापेक्षा नेहमीच अधिक राहिल्यामुळे यंदा उत्पादन वाढले तरी उत्पन्न वाढेलच, याची शाश्वती नाही. गतवर्षी १० क्विंटल सोयाबीन विकून जेवढे पैसे मिळाले तेवढेच यंदाही १५ क्विंटल विकून मला मिळणार. तुरीचा भाव गतवर्षी ८ ते १० हजार रुपये होता. तो यंदा ६ हजार रुपये असून हमीभाव ५ हजार ५० रुपयेच आहे. उत्पादनवाढीमुळे यंदा भाव पडू शकतात. उत्पादनवाढीचे चित्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच चांगले आहे, पण शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पण सरकारने आयात केली तर तोटा कुणाचा? –सरोज काशीकर

शेतकरी नेत्या सरोज काशीकर यांनीही निसर्गाची साथ असणे पुरेसे नाही, असे स्पष्ट करून शासनाच्या धोरणावर पुढील स्थिती अवलंबून असल्याचे स्पष्ट केले. उत्पादन वाढेल, पण उत्पन्न वाढणार नाही. बाजारात मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांची तूर आली, पण सरकारने आयात केली, तर तोटा कुणाचा, असा प्रश्न त्यांनी केला. या पाश्र्वभूमीवर यावेळी बाजारपेठ अस्थिर राहण्याची एक शक्यता व्यक्त होते. बाजाराचा रोख पाहून शेतकऱ्यांनी विक्री करणे अपेक्षिली जाते. काही म्हणतात, उत्पादनवाढीमुळे भाव घसरल्यास हमीभावाचाच आधार शेतकऱ्यांना राहतो. त्यासाठी सरकारची खरेदी केंद्रे लवकर सुरू होण्याची गरज आहे. ती सुरू करावी म्हणून शेतकऱ्यांना मोर्चे काढावे लागत असतील तर फोयदा काय, असा सवाल त्यांनी केला.

शेतकऱ्यांची क्रयशक्ती यंदा वाढेल -गिरीश काशीकर

येत्या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचे दिवे पेटणार काय, याविषयी ठोस उत्तर मिळत नाही. स्वत: शेती करणारे व बाजारपेठेचा अभ्यास ठेवणारे गिरीश काशीकर म्हणाले की, यंदा १९८५ सारखी सुखावह स्थिती शेतकऱ्यांची राहू शकते. मंदी काही प्रमाणात ओसरेल, मात्र, शेतकऱ्यांना समाधान मिळण्यासाठी राज्य शासनाने सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. एकूण शेतकऱ्यांची यंदा क्रयशक्ती वाढेल, हे निश्चित.

Story img Loader