मनोरंजनीकरण आणि बाजारपेठीय आव्हाने या कात्रीमध्ये सध्याची पत्रकारिता सापडली आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबर वाहवत जाण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा काही तरी वेगळे सांगणारी बातमी देणारी वृत्तपत्रेच भविष्यामध्ये टिकून राहतील, असे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी सोमवारी व्यक्त केले. पत्रकारिता टिकायला हवी असेल तर, चांगलं लिहिण्याखेरीज पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ‘वर्तमानपत्रे बदलत आहेत का’ या विषयावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान झाले. पत्रकारिता क्षेत्रापुढील आव्हाने आणि धोके यावर मार्मिक भाष्य करीत त्यांनी विषय उलगडला. पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप रणपिसे, सरचिटणीस गजेंद्र बडे, खजिनदार स्वप्नील बापट आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे या प्रसंगी उपस्थित होते. पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविलेल्या सदस्यांचा या वेळी गिरीश कुबेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गिरीश कुबेर म्हणाले,‘‘ सध्याच्या वृत्तपत्रांची अवस्था पाहिल्यानंतर वर्तमानपत्रातील मंडळींनाच हा व्यवसाय गांभीर्याने करायचा नाही असे वाटण्याजोगी स्थिती निश्चित आहे. लिहिता न येणारी आणि लिहिण्याची इच्छा नसलेली मंडळी हीच पत्रकारितेमध्ये उच्च स्थानावर आहेत. आपले कोण वाचणार आहे, असे म्हणत ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ स्वीकारण्याची वाढती मनोवृत्ती दुर्दैवी आहे. अशा रीतीने लेखन हा कणाच आपण गमावून बसत आहोत. महसूल गोळा करणे किंवा निधी संकलन हे कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्रकाराचे काम असता कामा नये. चटकन श्रीमंत होण्याबरोबरच पटकन खासदार होण्याचा मार्ग म्हणून पत्रकारितेचा वापर करणे हेदेखील धोकादायक आहे.’’  
‘‘पत्रकारिता हा डोक्याचा आणि ज्ञानमार्गी व्यवसाय आहे. त्यामुळे यामध्ये काम करणाऱ्यांनी त्याची नीतिमूल्ये पाळायला हवीत. पत्रकारिता टिकायला हवी असेल तर, उत्तम लिहिण्याखेरीज पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा बातमी पूर्णपणे वेगळी नसेल तर, वृत्तपत्रे विकत घेणार कोण? त्यासाठी बातमीमध्ये काही तरी वेगळे देण्याची ताकद आपल्याजवळ असली पाहिजे. बातमीमध्ये मूल्यवर्धन करणे महत्त्वाचे आहे,’’ असेही गिरीश कुबेर यांनी सांगितले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणाने उत्तरे देत पत्रकारितेचे वास्तव मांडले.
प्रदीप रणपिसे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा