कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशन परिसरात यांत्रिकीकरण सामान वाहतूक रेल्वेच्या डब्याला आग लागली. या आगीत डबा पूर्णत: जळून खाक झाला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.
सावंतवाडी पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. दरम्यान यांत्रिकीकरण सामान वाहतूक करणारा डबा असल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सद्यस्थितीत कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे त्याचा डेपो कुडाळ येथे आहे. त्या ठिकाणी मालवाहतूक करण्यासाठी या डब्याचा वापर करण्यात येत होता. मात्र आज सकाळी अचानक आग लागली. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्यांनी तात्काळ सावंतवाडी तसेच परिसरातील बंबाला पाचारण केले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत एक दीड तासाचा कालावधी उलटला होता. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले. यात कोणतेही नुकसान झालेले नाही असे करंदीकर यांनी सांगितले.
यादरम्यान या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे पेडणे आणि कुडाळ रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्या, त्यानंतर साडेअकरा वाजता मार्ग मोकळा झाल्यावर या गाड्या धावल्या मांडवी मडुरा तर तुतारी कुडाळ येथे थांबली होती, असे करंदीकर यांनी सांगितले.