पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील वाईजवळील एका फॉर्महाऊसवरून पोलिसांनी गजा मारणे याला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यासह अन्य ठिकाणी गज्या मारणे याच्याविरोधात खंडणी, अपहरणासारखे गुन्हे दाखल आहेत. मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलीस गज्या मारणेच्या मागावर होते. अखेर आज गज्या मारणेला गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे याला सातारा जिल्ह्यातील वाई येथील एका फार्महाऊसमधून ताब्यात घेतलं आहे. हा फार्महाऊस अॅड. विजय ठोंबरे यांचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गज्या मारणे याठिकाणी आपल्या वकिलाला भेटण्यास आला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी फार्महाऊसवर छापेमारी करत त्याला अटक केली आहे.
एका शेअर दलालाचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सातारा जिल्ह्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतलं आहे. शेअर दलालाचे अपहरण प्रकरणात गज्या मारणेसह १५ साथीदारांच्या विरोधात गु्न्हा दाखल केल्यानंतर मारणे पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यात येत होता. मारणेसह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे.
मारणे सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता, सहआयु्क्त संदीप कर्णिक, आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने वाई परिसरातून गज्या मारणेला ताब्यात घेतलं. मारणेला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक सायंकाळी पुण्याकडे रवाना झालं आहे.