Gopal Shetty Independent Candidate From Borivali Assembly Constituency : बोरीवली विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपाचे संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे गोपाळ शेट्टी यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. यासाठी आज गोपाळ शेट्टी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर गेले होते. तेथून आल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे अधिक संभ्रम निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोपाळ शेट्टी २००९ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. २०१४ मध्ये त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने विधानसभेला विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसंच, २०१९ ला सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर, आता २०२४ ला संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे गोपाळ शेट्टी नाराज झाले आहेत. याबाबत गोपाळ शेट्टी म्हणाले, “मी अनेकदा बोललो आहे की संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांना पुढे पाऊल टाकण्याची शिकवण दिली आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय की मी पक्ष सोडला नाही आणि सोडणारही नाही. पक्षाने काढलं तरी मी पक्ष सोडणार नाही.”

हेही वाचा >> Devendra Fadnavis : “उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

उमेदवारी अर्ज मागे घेणार का?

दरम्यान, ते निवडणूक लढवण्यवर ठाम आहेत का असाही प्रश्न त्यांंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आजही मी याच मतावर ठाम आहे. मी जे काही काम करतोय ते पक्षहितासाठी करतोय. पक्षाला पक्षाचं काम करावं लागतं. परंतु, माझा मुद्दा आहे की मी अन्य पक्षात जाणार नाही. भाजपा पक्षाचं ध्येयधोरण वेगळं आहे. पक्षात काही लोक आहेत जे अशा प्रकारचे हानी पोहोचवण्याचं काम करतात. त्यांच्याविरोधात माझी लढाई आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणार का असं विचारल्यावर ते म्हणाले, पक्षहितासाठी जे करायचं आहे ते मी करणार. कारण, गोपाळ शेट्टीच्या हृदयात, मनात आणि मस्तकात कमळ आहे.

विनोद तावडे काय म्हणाले?

“मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे”, असं विनोद तावडे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

त्यामुळे ते आता उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopal shetty independent candidate from borivali assembly constituency meet devendra fadnavis sgk