सांगली : वसंतदादांसह प्रस्थापित नेत्यांनी दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत आरआर आबांचा मुलगा आमदार होतो, मात्र आपला मुलगा आमदार होत नाही, या चिंतेने आ. जयंत पाटील ग्रासले असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केली.

धनगर समाजाच्यावतीने रविवारी सायंकाळी सांगलीत आ. पडळकर, आ. सुधीर गाडगीळ व आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

हेही वाचा >>>रत्नागिरी : कोंबड्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अडकला खुराड्यात

आ. पडळकर यावेळी म्हणाले, प्रस्थापितांच्या विरोधात गेलो. संघर्ष केला म्हणून खोट्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात घातले. पण जितके खोटे गुन्हा दाखल केले, त्या दसपटीने लोकांनी हार घातले. याच जनतेच्या प्रेमावर निवडून आलो. आमदार झालो. हा सत्कार प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्यांचा आहे, केवळ ११ हजारांनी निवडून आलेल्या आ. जयंत पाटील यांना आर. आर. पाटलांचं पोरगं आमदार झालं, आपलं का नाही, याची चिंता सतावत असल्याचे ते म्हणाले.

सांगली जिल्हा दोन पुढाऱ्यांचा जिल्हा असल्याचे बोलले जाते. पण हा जिल्हा बारा बलुतेदारांचा आहे. १९९० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही. वसंतदादांसह कृष्णा काठच्या नेत्यांनी दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी येऊ दिले नाही. अडीच वर्षे जलसंपदा मंत्रिपद मिळून देखील काम केले नाही. जत तालुक्यासह दुष्काळी भागावर यांनी अन्याय केला. दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले तर आमच्या कारखान्यासाठी ऊस तोडायला कोण येणार, असे वसंतदादा म्हणायचे, असा आरोपही आ. पडळकर यांनी यावेळी केला.

Story img Loader