महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही सभाचं आयोजन करत आहेत. तर, धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे-पाटलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही घेण्यास तयार नाहीत,” असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जरांगे-पाटलांना लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा : मनोज जरांगे पाटील यांचा सवाल, “आमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा कोणता डाव?”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिलं होतं.”

“काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या आहेत. ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचं नावंही घेण्यास तयार नाहीत. मात्र, यांना आरक्षण पाहिजे… असं कसं चालेल?” असा सवाल गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “एखादा कलेक्टर कांबळे असला तर त्याच्या हाताखाली मराठा समाजाने…”, छगन भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर

“७० वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.

यावर जरांगे-पाटील यांनीही भाष्य केलं आहे. “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. ते काहाही बोलतात. त्यांनी पाहिलं नसेल, पण मी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतो. महाडला देखील मी जाऊन आलोय,” असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar attacks manoj jarange patil over dr babasaheb amabedkar name maratha reservation ssa