भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून महाविकासआघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. सरकारने वेळेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असतील तर ३१ जणांचे प्राण वाचले असते, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. तसेच आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात. पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही, असा आरोपही पडळकर यांनी केला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “बीडमधील एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण त्यांचा डॅाक्टरांमुळे प्राण वाचला. अजुनही परिस्थिती नाजूक आहे. आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर सरकारने वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती, तर ३१ जणांचे प्राण वाचले असते. महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती.”

“मुख्यमंत्र्यांना आर्यन खानसाठी वेळ, एसटी कर्मचाऱ्यांसाठी नाही”

“जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का? असा सवाल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत. आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात, पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्याने एसटीला लटकून घेतला गळफास; दिवाळीच्या तोंडावरच अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

“आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा,” असंही पडळकर म्हणाले.

Story img Loader