Gopichand Padalkar on Sharad Pawar : विधान परिषदेवर आमदार असलेले गोपीचंद पडळकर आता सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांमधील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यातच, ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाने टोक गाठले. दरम्यान, आता जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यांनी आता स्वेच्छेने सेवानिवृत्ती घ्यावी असं पडळकर म्हणाले आहेत. आज मुंबईत दाखल झाल्यानंतर ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आता विषय संपला
ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून भाजपाने लहान राज्यात पराभव स्वीकारला तर मोठी राज्ये स्वतःकडे ठेवली, अशी टीका शरद पवारांनी केली होती. या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणाले, “शरद पवारांनी आता स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी विधानसेपूर्वीच निवृत्ती घ्यायला हवी होती. लोकसभेत जिंकल्यानंतर महाराष्ट्र महायुतीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. परंतु, आता विधानसभेत तुम्हाला जागा दाखवली आहे. कोलांट्या उड्या घेणारा हा माणूस आहे. आता विषय संपला आहे. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे संपला आहे.”
हेही वाचा >> Raosaheb Danave : अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंना शब्द? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…
दरम्यान विधानसभेसाठी गोपिचंद पडळकर यांच्या उमेदवारीला भाजपाकडूनच मोठा विरोध झाला होता. स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची विनंती करण्यात आली होती. जत तालुक्यातील प्रश्नांची जाण असलेला स्थानिक उमेदवारच भाजपाने द्यावा, केवळ आमदारकीसाठी लुडबूड करणार्यांना पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करणार नाहीत अशी भूमिका भाजप व शिवसेना पदाधिकार्यांनी बैठकीत व्यक्त केली होती. परंतु, तरीही गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली.
गोपीचंद पडळकरांचा ३८ हजार मतांच्या फरकाने विजय
त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांचं आव्हान होतं. हे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी मोडून काढलं आणि ३८ हजार मतांच्या फरकाने ते विजयी झाले. गोपिचंद पडळकर यांना १ लाख १३ हजार ७३७ मते मिळाली तर, विक्रमसिंह सावंत यांना ७५ हजार ४९७ मते मिळाली आहेत.
b