Gopichand Padalkar Chappal Thrown : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. तर, मराठा समाजाला ओबीसीतील कुणबी जातप्रमाणपत्र हवं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. यातूनच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील अशा कृती घडत आहेत. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल (९ डिसेंबर) इंदापूर येथे चप्पल फेकण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. आता, त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत संयमाने आणि शांततेनं महाराष्ट्रातील एल्गार मेळाव्यातून आरक्षणाबाबतची भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा झाल्यानंतर, शेतकऱ्यांच्या दूधाला दर मिळावा म्हणून जे शेतकरी उपोषणाला बसले आहेत त्यांना भेटायला जात असताना ही नौटंकी घडली. नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाजी करत माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला आहे असं मीडियामध्ये पसरवलं.
हेही वाचा >> गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक; छगन भुजबळ संतापले, मराठा आरक्षणाचा उल्लेख करत म्हणाले…
“आमची भूमिका स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाकंटकांनी कधी कोणाची घरं जाळली, कधी कोणाला शिव्या दिल्या, कधी कोणाच्या गाडीवर दगडं टाकली. याचा अर्थ असा होतो की समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रात अशांतता पसरवायची आहे, दंगली घडवायच्या आहेत. यामगचा सुत्रधार आम्हाला माहित आहे, कारण तोच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा शत्रू आहे. मी शांतेतची आणि संयमाची भूमिका काल घेतली नसती तर या भेकडाच्या अंगावर कपडेसुद्धा राहिले नसते, असा इशाराही गोपीचंद पडळकरांनी दिला.
तसंच, याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नका, असं आवाहनही गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला केलं आहे. कारण, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांना आरक्षण दिलं. या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरता उद्या (११ डिसेंबर) नागपूर येथे इशारा मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सामील होऊन, याचा निषेध व्यक्त करूया, असंही पडळकर म्हणाले.