राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यापर्यंत मतदान या निवडणुकीत झालं आहे. आज ( २० नोव्हेंबर ) ग्रामपंचायतींचा निकाल समोर येत आहे. या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच भाजपाने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाल्या आहेत.
हेही वाचा : दोन ग्रामपंचायती ‘आप’कडे तर मनसेची पालघरमध्ये बाजी; राज ठाकरे म्हणाले, “हा आकडा…”
पडळकरवाडी ग्रामपंचायतीवर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर पडळकर समर्थकांचा विजय झाला आहे. तर, गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
पडळकरवाडीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, विरोधकांमुळे अखेर निवडणुकीसाठी सामोरे जावे लागले. निवडणुकीला अत्यंत चुरशीचं मतदान झालं. पण, आज समोर आलेल्या निकालानंतर हिराबाई पडळकर या विजय झाल्या आहेत.
याबाबत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, “आई आणि राजकारणचा काही संबंध नव्हता. माझी आई रोज शेतात काम करते. या निवडणुकीसाठी पाच उमेदवार इच्छुक होते. कोणच अर्ज माघे घेण्यास तयार नव्हते. पण, आमच्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी आमच्या आईला पाठिंबा दिला. मात्र, मला आनंद आहे, गावातील वडिलधारी मंडळींनी खूप सहकार्य केलं, त्यांचं आभार,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.