भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली होती. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक आहे, अशा आशयाची टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती.
या टीकेनंतर आता वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांना नोटीस पाठवली आहे. पुढील सात दिवसांच्या आत गोपीचंद पडळकरांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा देणारी नोटीस गोपीचंद पडळकरांना पाठवली आहे. या नोटीसवर आता गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाचीही माफी मागणार नाही, असं वक्तव्य पडळकरांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “सुप्रिया सुळेंचं मानसिक संतुलन…”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका
असीम सरोदे यांच्या माध्यमातून पाठवलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, माझ्याविरोधात कुणी नोटीस काढली? आणि कशासाठी काढली? याची मला काहीही कल्पना नाही. परंतु तुमच्याकडून मिळालेली माहिती खरी असेल तर मी कुणाची कसलीही माफी मागत नाही. कुणी नोटीस पाठवली असेल तर ती नोटीस मला ज्यादिवशी मिळेल, त्यादिवशी मी सविस्तर बोलेन.
हेही वाचा- “भुजबळांचा क्रिकेटशी संबंध नाही, त्यांना गुगली…”, शरद पवारांवरील आरोपांवर अनिल देशमुखांची ‘बॅटींग’
नेमकी नोटीस काय आहे?
गोपीचंद पडळकरांवरील नोटीसवर भाष्य करताना वरिष्ठ वकील असीम सरोदे म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर विधान केलं होतं की, अजित पवार हे लांडग्याचं पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळेही लांडग्याचं पिल्लू आहे. पण दुसऱ्याची अब्रू नुकसान करणं, अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांच्यातर्फे गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. पडळकरांनी सात दिवसात माफी मागितली नाही किंवा नोटीसला उत्तर दिलं नाही, तर पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.”