भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी ( ९ जानेवारी ) पवार कुटुंबावर टीका केली होती. बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. यावर उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास मी मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. याला आता गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, “पवार कुटुंबाला मी पुरुन उरलो आहे. त्यांना सळो की पळो केलं आहे. त्यामुळे अजित पवार निरुत्तर असून, योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईल. बरोबरी करण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. जनतेने जास्त मतं दिली, या मस्तीत त्यांना जाऊ नये. बारामतीतील लोकांनी तुम्हाला एवढ्यावेळा आमदार केलं. तेथील ४४ गावांना पाणी देऊ शकला नाही,” असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
हेही वाचा : “शिवसेना फुटावी ही शरद पवारांची इच्छा नाही, तर…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
काय म्हणाले होते अजित पवार?
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास अजित पवार मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. डिपॉजिट जप्त करुन पाठवलं आहे”, असा टोला अजित पवारांनी पडळकरांना लगावला होता.