अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक नेत्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते, काँग्रेसचे नेते, अजित पवारांचे समर्थक अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही राहतील. तरीदेखील अजूनही काही नेते सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होतील असे दावे करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी पटेल म्हणाले, अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतील. परंतु आत्ता मुख्यमंत्रीपद रिकामं नाही त्यामुळे यावर चर्चा कशासाठी करताय? अजित पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. कधी ना कधी ते मुख्यमंत्री होतील. काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या, उद्या नाहीतर परवा, अशी संधी नक्कीच मिळते. अनेकांना अशी संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारही आज नाहीतर उद्या नक्कीच मुख्यमंत्री होतील.
दरम्यान, प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भूमिका मांडल्यावर दुसऱ्या कोणाचं काही मत असेल तर त्याला फार काही महत्त्व राहतं असं मला वाटत नाही. महायुतीत आमचे १०५ आमदार आहेत, आमच्या बरोबर जे सात आमदार आहेत त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? कसा होणार? यावरील चर्चेला काही अर्थ नाही.
हे ही वाचा >> “आम्ही आठ माळे चढू शकत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोल
पडळकर म्हणाले, अशा प्रकारचं वक्तव्य महायुतीतल्या आमच्या कुठल्या सहकाऱ्याने करण्याऐवजी पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भूमिका मांडतील. आमच्या सारख्या लोकांनी यावर बोलणं योग्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते या विषयावर बोलले आहेत, त्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम द्यावा आणि युती धर्माचं पालन करावं.