सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दोन ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याच आयोजन करण्यात आले यासंदर्भातील माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकारांनी माजी पालकमंत्री जयंत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. अगदी बापाचा उल्लेख करत पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पाटील यांच्यावर टीका केली.

पत्रकारांनी जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात प्रश्न विचारला असता पडळकर यांनी जयंत पाटलांनी पालकमंत्री असताना सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचं विधान केलं. “जयंत पाटलांच्या मनामध्ये प्रंचड भिती होती की आपलं काहीतरी प्रकरण चर्चेत निघेल. आपल्याबद्दल काहीतरी बोललं जाईल. आपण रुबाबात राहिलोय या जिल्ह्यामध्ये असं त्यांना वाटायचं. जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते वागले होते. त्यांना ते खटकत होतं. त्यामुळे ते मला बोलवत नव्हते,” असं जिल्हा नियोजन बैठकीसंदर्भात पडाळकर म्हणाले.

“माझ्या भावाविरोधात हद्दपार होण्याची नोटीस काढली. आता तेच हद्दपार झाले सत्तेमधून. म्हणजे सत्तेचा इतका माज चांगला नसतो,” असा टोलाही त्यांनी लगावला. “जो जिल्हापरिषदेचा सदस्य आहे. त्याला या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सभापती म्हणून सगळ्यात चांगलं काम केलंय. तुम्ही (प्रासरमाध्यमांनी) अनेकदा छापलंय. त्यांना तुम्ही हद्दपार होण्याची नोटीस देता. म्हणजे सत्तेचा गैरवापर करण्याचे तुम्ही किती प्रयत्न केले. मात्र याचं काही झालं नाही. त्यांना वाटलं आम्ही शरण येणार. पण आम्ही शरण येणारी लोक नाही. आम्ही काम करणारी लोक आहोत,” असं पडाळकर म्हणाले.

“जेव्हा आमचे पालकमंत्री बैठक घेतील तेव्हा ते सगळ्यांना बोलवतील. ते चुकीच्या पद्धतीने हे सारं घेणं, निरोप न देणं असा कुठलाही प्रकार भाजपाकडून होणार नाही,” असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला.

“गेल्या दोन वर्षात करोनाची प्रचंड महामारी असल्याने आम्हाला दसरा मेळाव्याचं आयोजन करता आलं नाही. महाराष्ट्रातील समाज एकत्र व्हावा. एकमेकांसोबत विचारमंथन व्हावं. विचारमंथनातून जागृती व्हावी. त्यातून एक मोठं संघटन तयार व्हावं. संघटन तयार झाल्यानंतर संघर्ष करण्याची मानसिकता लोकांमध्ये आपोआप येत असते,” असं पडळकर यांनी धनगर समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मेळाव्यासंदर्भात म्हटलं.

तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांमधील भाविकांचं तिर्थस्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आरेवाडी येथे श्री बिडोबाच्या बडामध्ये यावर्षीच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. घटनस्थापनेनंतर आपण सातव्या माळेला दसरा मेळावा घेतो. या वर्षी २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचं आयोजन आरेवाडी येथे केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करतो,” असंही त्यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या विविध प्रश्न, अडचणींवर मेळाव्यात चर्चा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं.

Story img Loader