देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला म्हणजेच विवेक अग्निहोत्रींना केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय. याच निर्णयावरुन आज शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखामधून अती महत्वाच्या व्यक्तींना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसंदर्भातील धोरणात्मक निर्णयांवर शिवसेनेनं निशाणा साधलाय. मात्र याच मुद्द्यावरुन आता भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. पडळकर यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राऊत यांना थेट आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा >> “वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…”; अमृता फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर संजय राऊतांचं उत्तर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थेट आव्हान…
सरसकट होलसेलमध्ये ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर आल्याची टीका करणाऱ्या शिवसेनेवर पडळकर यांनी टीका केलीय. “जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखं महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्याविना फिरा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल,” असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

यावर एखादा लेख लिहा…
तसेच, “जनाब राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त तुम्ही करताय. यावर कधीतरी एखादा लेख लिहावा असं तुम्हाला वाटलं नाही,” असंही पडळकर म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “…तेव्हा मोदींनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तिरंगा फडकावला होता”; BJP आमदाराचा राऊतांना टोला

शिवसेनेनं वाचला सुरक्षा दिलेल्यांच्या नावांचा पाढा
“देशातील वातावरण मोकळे व सुरक्षित राहिलेले नाही. केंद्र सरकारने ऊठसूट ‘वाय’ पिंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे मोदी-शहांच्या काळात मोकळेपणाने जगण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांना उगाच भय वाटते. हे भय टोकाचे आहे. मात्र भाजपपुरस्कृत भयग्रस्तांना केंद्र सरकार खास सुरक्षा व्यवस्था पुरवीत आहे. ‘हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही’ असा निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले. त्याआधी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनाही केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था जाहीर केली. महाराष्ट्रविरोधी बेताल वक्तव्य करणारी नटी कंगना राणावत हिलादेखील ‘वाय’ सुरक्षा देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनाही गेल्याच महिन्यात ‘वाय’ सुरक्षा देण्यात आली आहे,” असा वाय दर्जाच्या सुरक्षेचा इतिहासच शिवसेनेनं वाचून दाखवला आहे.

महात्मा किरीट सोमय्या…
“महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर खोटे आरोप करून चिखलफेकीचे कंत्राट घेणाऱ्या महात्मा किरीट सोमय्या यांनाही केंद्र सरकारने ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देऊन उपकृत केले आहे. बाकी नारायण राणे वगैरे केंद्रीय मंत्र्यांनाही मोदी सरकारने दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा दलाची विशेष ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे,” असं महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेसंदर्भात बोलताना शिवसेनेनं म्हटलंय.

चणे-कुरमुरे वाटावेत तशी सुरक्षा व्यवस्था पुरवली
“प. बंगालातही ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना केंद्राने चणे-कुरमुरे वाटावेत तशी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. केंद्रातले अनेक मंत्री व अधिकारी अशा पद्धतीने सुरक्षेचे पिंजरे घेऊन फिरत आहेत आणि हे पिंजरे वाटप केंद्र सरकार हौसेने करीत आहे. याच वेळी हिंदीतले प्रख्यात पत्रकार, लेखक आशुतोष यांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. ‘‘घरात घुसून मारू’’ असे बजावले जात आहे. आशुतोष हे ‘सत्य हिंदी’ या पोर्टलच्या माध्यमातून परखड लिखाण करीत असतात. त्यामुळे मोदींचे अंध भक्त त्यांच्यावर खवळून उठले आहेत. आशुतोष यांचा काटा काढण्याचे कारस्थान काही अंध भक्तांनी रचले असेल तर त्यांच्या जीविताचे रक्षण कोणी करायचे? पण सध्या देशात अंध भक्त व त्यांचा अजेंडा राबविणाऱ्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा झटपट मिळते, तर आशुतोष यांच्यासारखे पत्रकार डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नेमके उलटे घडत आहे
“देशातील वातावरण भयमुक्त व मोकळे होईल असे मोदी आल्यापासून वाटत होते, पण नेमके उलटे घडत आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयानंतर देशातील अतिरेकी प्रवृत्तींचा बीमोड होईल, अशी ‘मन की बात’ पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली, पण देशाला अतिरेकी, धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांपासून कसा धोका आहे हे जनतेच्या मनावर बिंबविण्याचा व तसा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे,” असा टोला या लेखातून लागवण्यात आलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar slams sanjay raut over y category security comment scsg