भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पक्षाला कधी तीन आकडी आमदार संख्या गाठता आली नाही असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांविषयी केलेल्या विधानावरून पडळकर यांनी टोला लगावल्यानंतर या टीकेवरुन आता राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा >> “पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान
इंदापूरमधील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबदल्ल बोलताना, “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यात काय गंमत होते ठाऊक नाही. एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते काही दिवसांनी पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, म्हटलं होतं. या विधानावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. पडळकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी उदाहरणं देत पवारांवर टीका केली.
“त्यांच्यामागून (शरद पवारांच्या) देशात अनेक लोक आहे. ममता बॅनर्जी स्वत:च्या ताकदीने तीन ते चार वेळा मुख्यमंत्री झाल्या, मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादीच्या वाट्यालाही मुख्यमंत्रीपद आलं. वडिलांचा पक्ष, चिन्हं गेलेल्या जगनमोहन यांच्यासारख्या तरुण मुलाने एकहाती सत्ता आणली. केजरीवालांनीही एकहाती सत्ता आणली.सुप्रिया यांना विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही काम करत आहात. मग राष्ट्रवादीला तीन अंकी आमदार कधी निवडून का आणता आले नाहीत?” असा सवाल पडळकरांनी केला होता.
नक्की वाचा >> “आपल्या बापाची जहागीरदारी आहे अशा रुबाबात ते…” गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका; म्हणाले, “माझ्या भावाविरोधात…”
या टीकेसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली आहे. “गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. गेली ३० ते ४० वर्ष स्वबळावर मुख्यमंत्री आणता आला नाही किंवा तीन अंकी आमदार आणता आले नाहीत. ते आता सत्तांतराची स्वप्न पाहत आहेत,” असा संदर्भ देत पत्रकाराने मिटकरांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मिटकरींनी पडळकरांना दुसरा काही धंदा नसल्याने पवार यांचं नाव घेऊन लोकप्रियता मिळवायची हा त्यांचा एक धंदा असल्याचा टोला लगावला.
“कसं आहे की दुसरा काही धंदा नाही. लोकप्रियतेसाठी पवारसाहेबांचं नाव वापरणं हा एक धंदा आहे. त्यांना स्वत:ला अनुभव आहे. बारामतीत डिपॉझिट का गेलं याचं उत्तर द्यावं किंवा नगरपंचायतमध्ये डिपॉझिट का जप्त झालं याचं उत्तर द्यावं. त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत द्यावी असं मला वाटतं नाही,” असं अमोल मिटकरी म्हणाले.