पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असलेले नागपूरमधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन शेवटच्या दिवशीही वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसे पत्र विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं आहे. पण, याची विरोधी पक्षनेते अजित पवारांना जराशीही कल्पना नसल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना याबाबत विचारलं. अजित पवार म्हणाले, “राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांकडून पत्र देण्यात आलं, तेव्हा मी सभागृहात होतो. त्यामुळे याची कोणतीही कल्पना नाही. मला ते थोडफार कळतं, त्यांच्याविरोधात एक वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही. माझी संमती असती, तर पत्रावर मी सही केली असती. यासंदर्भात माहिती घेऊन बोलेन,” असं अजित पवारांनी सांगितल.
हेही वाचा : “आता आरक्षण बास झालं” शरद पवारांच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची टीका; म्हणाले, “गोरगरीब लोकांची…”
यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका करत अजित पवारांना टोला लगावला आहे. “विरोधकांची परिस्थिती खुळ्यांची जत्रा आणि कारभारी सतरा अशी झाली आहे. त्यांचा एकमेकात मेळ नसून, गैरमेळ आहे. एकवाक्यता आणि एकमत नाही. नेमकं विरोधकांनी भूमिका काय बजावली पाहिजे, याचं नियोजन नाही. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीने बैठका घेतल्या. सरकारला धारेवर धरा, पण लोकांच्या प्रश्नावरून,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
हेही वाचा : संजय राऊतांनी अनिल देशमुखांची घेतली भेट; नवाब मलिकांचा उल्लेख करत म्हणाले, “ज्यापद्धतीने आमच्यावर…”
“विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणला, त्याचा कारणही कोणाला माहिती नाही. विरोधी पक्षनेते यांना याची माहिती नसून, त्यांची सही देखील नाही. हे जहाज समुद्रात भरकटलं आहे. याला किनारा सापडण्याची शक्यता वाटत नाही. १५ दिवस सरकार, सभागृह आणि जनतेचा विरोधकांनी वाया घालवला,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.