ओबीसींच्या आर्थिक उन्नतीसाठी देशातील सर्व ओबीसी नेते एकत्र येत आहेत. आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रत्यक्ष असा लाभ न झाल्याने तसेच जाहीर केलेले आरक्षणही अपूर्ण असल्याने ओबीसींसाठी आता स्वतंत्र मंत्रालय हवे, अशी मागणी भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित अखिल वंजारी विकास परिषदेच्या स्थापना मेळाव्यात ते बोलत होते. वंजारी समाजाने सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भगवानगडचे न्यायाचार्य नामदेवशास्त्री सानप हे होते. या वेळी डॉ. तात्याराव लहाने आणि अ‍ॅड. भास्कर आव्हाड यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुंडे यांनी आपल्या भाषणात अधिक भर ओबीसींच्या आरक्षणावर व वंजारी समाजाच्या एकत्रीकरणावर दिला. खरे ओबीसी कोण आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही ओबीसींची ‘डीएनए टेस्ट’ करण्याची भाषा जर कोणी करीत असेल तर ते कदापि होऊ देणार नाही, असा इशारा खा. मुंडे यांनी दिला. ओबीसींच्या आर्थिक उन्नतीसाठी देशातील सर्व ओबीसी एकत्र येत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आपला विरोध नाही. परंतु त्यांना सामाजिक आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याचा मुद्दा मांडताना मुंडे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे समजून न घेता जमीन ताब्यात घेतली जात असेल तर इंडिया बुल्सचा रेल्वेमार्ग कधीच होऊ देणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
या मेळाव्यास आ. जितेंद्र आव्हाड, आ. पकंजा पालवे-मुंडे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, अ‍ॅड. एन. एम. आव्हाड, प्रल्हाद पाटील कराड, डॉ. डी. एल. कराड, जगन्नाथ धात्रक आदी नेते उपस्थित होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा