गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षात दु:खी होते. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते सुखी झाले असतानाच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या विचारांचे हजारो मुंडे तयार झाले पाहिजेत, असे सांगून जातींमुळे देश सडला. जातींच्या बेडय़ा तुटल्याशिवाय देश उभा राहणार नाही. त्यासाठी देशात ५२ टक्के असलेल्या ओबीसींनी एकत्र येऊन जातीयवादाला मूठमाती दिली पाहिजे, असे आवाहन संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले.
प्रा. सुशीला मोराळे यांच्या पुढाकारातून मंडल आयोग दिनानिमित्त ओबीसी जागृती मेळावा यादव यांच्या उपस्थितीत झाला. प्रताप बांगर, भगवानगडाचे सचिव गोिवद घोळवे आदी उपस्थित होते. यादव म्हणाले, की भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची सामाजिक, आर्थिक धोरणे सारखीच आहेत. काँग्रेसकडे बहुमत नसल्यामुळे ते विदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकले नाहीत. भाजपने सत्तेत येताच विदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेणे सुरू केले. देशात ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाच्या मतांवर सरकार स्थापन होतात. मात्र, याच समाजाला हक्क मागण्यासाठी भीक मागावी लागते. ओबीसींमधील जातींची तीव्रता जास्त असल्याने संख्येने ८० टक्के असलेला हा समाज संघटित नाही. देशातील प्रसारमाध्यमे बुद्धिवंत व धनाढय़ लोक एकत्र येऊन जातिव्यवस्था पोसण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये दु:खी होते. पक्ष सोडण्याचाही त्यांचा विचार होता. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते सुखी झाले असतानाच अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे दु:ख उगाळत न बसता त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे हजारो मुंडे तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. प्रा. मोराळे यांनी मंडल आयोग लागू होऊन अनेक वष्रे लोटली, तरी अंमलबजावणी झाली नाही, याकडे लक्ष वेधले.
मुंडे भाजपमध्ये दु:खी होते- शरद यादव
गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षात दु:खी होते. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते सुखी झाले असतानाच त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या विचारांचे हजारो मुंडे तयार झाले पाहिजेत, असे सांगून जातींमुळे देश सडला.
First published on: 12-08-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath munde sad in bjp sharad yadav