सुरेश धस हे काय रसायन आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुंडेंना आव्हान देतो आहे याची साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. आम्ही व्यक्तीगत कधी बोलत नाही. भाजप उमेदवाराबाबत काय बोलावे? त्यांना सकाळ-संध्याकाळ राष्ट्रवादीच दिसते. पाच वर्षांत संसदेत जिल्हय़ाच्या प्रश्नावर एकदाही खासदार बोलल्याचे आठवत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार बदामराव पंडित, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपस्थित होते. या निवडणुकीत राज्याचे लक्ष बीड मतदारसंघाकडे आहे. भाजप उमेदवार मुंडे यांना राष्ट्रवादीचे नाव घेतल्याशिवाय जमत नाही. ते झोपेतही आमच्याच नावाने वाचाळतात, असा टोला लगावला. भाजपला सत्ता मिळाली. मात्र, कर्तृत्व दाखवता आले नाही. उपमुख्यमंत्रिपद मिळाले; पण त्याचा लाभ जिल्हय़ास झाला नाही. पाच वष्रे संसदेत मुंडेंनी जनतेचे कोणते प्रश्न मांडले? असा सवाल केला.
पालकमंत्री क्षीरसागर यांनी मोदींप्रमाणेच मुंडेंचेही मला पाहा अन् फुले वहा, असे सुरू आहे. निवडणुकीत मुंडेंची मालामाल एक्सप्रेस परळीहून निघाली. ती कोठे कोठे थांबते सांगता येत नाही, अशा शब्दांत मुंडेंच्या फोडाफोडीचा समाचार घेतला. उमेदवार धस यांनी मुंडेंनी केंद्राच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये एक रुपयाचा निधी आणला नाही, ते पूर्ण अपयशी ठरले, असा आरोप केला.
गुरुवारी अंबाजोगाईत बोलताना भाजप पंतप्रधानपद व मंत्र्यांचे खातेवाटप करीत आहे. लोकशाहीवर विश्वास नसलेली हुकूमशाही वृत्तीची माणसे भाजपत आहेत. अशा लोकांच्या हातात देशाची सत्ता मतदारांनी देऊ नये, असे आवाहन पवार यांनी केले. अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. रमेश आडसकर यांनी मतदारसंघ राखीव असल्याने जि. प.च्या डबक्यातूनच आपण राजकारण करीत असल्याचे व मागील वेळी आपली लायकी काढणारे आज राष्ट्रवादीबरोबर येऊन मतदान कसे घेतले, याची जाहीर कबुली देत आहेत, असे सांगत मनातील खदखद व्यक्त केली.

Story img Loader