बीड मतदारसंघात भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी नेत्रदीपक विजय मिळविला. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी प्रतिष्ठा पणाला लावताना निर्माण केलेला ‘चक्रव्यूह’ भेदून मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांचा दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव करून विजय खेचून आणला. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या सहाही मतदारसंघांत मताधिक्य घेत मुंडे यांनी जादूची कांडी प्रभावी असल्याचे पुन्हा सिद्ध केले. मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळाले.
सतराव्या फेरीअखेर मुंडे यांनी ४ लाख ८१ हजार २८६, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी ३ लाख ७९ हजार ७९७ मते घेतली. या फेरीअखेर मुंडे यांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेत विजय निश्चित केला. आम आदमी पक्षाचे नंदू माधव यांना ३ हजार ३७१, तर बसपचे दिगंबर राठोड यांना ११ हजार ४८ मते मिळाली. १२ लाख ३७ हजार मतांची मोजणी २६ फेऱ्यांमध्ये सकाळी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच मुंडे यांनी आघाडी घेतली, ती कायम राहिली.
राष्ट्रवादीचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड विधानसभा क्षेत्रात मुंडेंची लाट थांबवण्यात यश मिळाले. येथे भाजपला सर्वात कमी ४ हजार ३४० मतांचे अधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांच्या आष्टी मतदारसंघातही मुंडेंना ६ हजारांचे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व अमरसिंह पंडित यांच्या गेवराई मतदारसंघातून भाजपला अनपेक्षितपणे ३० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्येही ३३ हजार, तर पृथ्वीराज साठे यांच्या मतदारसंघातही ३३ हजारांचे मताधिक्य मिळाले. परळीत भाजप आमदार पंकजा पालवे प्रतिनिधित्व करतात. मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात मुंडेंची लाट थांबविण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या मतदारसंघातही २७ हजारांचे मताधिक्य मुंडेंनी मिळवले.
मतमोजणीच्या २६ फेऱ्यांपकी १७ फेऱ्यांचे निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आले. उर्वरित ९ फेऱ्यांतील मतांची आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादीच संपली – मुंडे
पवार काका-पुतण्याने सत्ता, संपत्ती, दादागिरीचा वापर करून बीडमध्ये मला कोंडून ठेवण्यासाठी ताकद पणाला लावली. मात्र, मी राज्यभर प्रचार केला. बीडच्या जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिला. राष्ट्रवादीला राज्यात केवळ चार जागा मिळाल्याने हा पक्ष संपला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल, असे वातावरण आहे. बीडच्या सहाही मतदारसंघांत आता महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा मुंडे यांनी केला.
सरकारच्या चुकांचा परिणाम – धस
काँग्रेस सरकारच्या चुकांमुळे देशात सर्वत्र जनमत विरोधात गेले. नरेंद्र मोदी यांची लाट व गोपीनाथ मुंडे उमेदवार यामुळे भाजपला विजय मिळाला. चुका सुधारून विधानसभेच्या तयारीला लागणार आहोत, असे धस यांनी सांगितले.