संतोष मासोळे
एकनाथ खडसेंप्रमाणेच बाजूला सारण्याचे राजकारण?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची धुरा सोपविण्यात आल्याचे शिक्कामोर्तब झाले, ते जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची मोट भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी धोक्याची ठरेल, असे चित्र तयार होत असताना खुद्द गोटे यांनी अनपेक्षितपणे घेतलेला राजीनाम्याचा पवित्रा भाजपसाठी तापदायक ठरला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रमाणे भाजपने गोटे यांना बाजूला सारून राजकारण करण्याची व्यूहरचना आखली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमध्ये उफाळलेल्या मतभेदांची चर्चा रंगली आहे. भाजप गोटे यांना नारळ देण्याच्या पवित्र्यात असताना गोटे यांनी आपणच आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारकीचा राजीनामा देणार असलो तरी पक्षाचे सदस्यत्व कायम ठेवणार असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे. यामागे भाजपची डोकेदुखी वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. धुळे शहरात भाजपमध्ये जे राजकारण सुरू आहे, त्याला जळगाव आणि राज्याच्या राजकारणात खडसे-महाजन गटात सुरू असलेल्या बेबनावाचा संदर्भ असल्याची चर्चा आहे.
माजी मंत्री खडसे यांना भाजप नेतृत्वाने अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक दूर ठेवले. खडसे यांना नामोहरम करून खडसेंच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात गिरीश महाजन यांचे राजकीय बस्तान अधिक मजबूत करण्यावर भर दिला गेला. मुळात २०१४ची विधानसभा निवडणूक गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर लढवावी यासाठी खडसे यांनी प्रयत्न केले होते. गोटे यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. परंतु तेव्हा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष देवरे यांच्यासाठी काम केले होते, असा गोटे यांचा आरोप आहे. खडसे-गोटे यांचे संबंध आधीपासून चांगले आहेत.
गोटे यांना भाजप नेत्यांनी दिलेली वागणूक आणि खडसे यांची पक्षात होणारी घुसमट यामध्ये एक समान धागा आहे. उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडसेंना पक्षाने निर्णय प्रक्रियेतून वगळले आहे. आता अनिल गोटे यांच्याबाबत तोच कित्ता गिरविल्याची समर्थकांची भावना आहे. शेजारील मुक्ताईनगर, जळगाव, जामनेर येथेही खडसे यांच्याविरुद्ध भाजप नेतृत्वाने अशाच कमी-अधिक फरकाने निवडणुकीचे नियोजन करीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणले. त्या ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक, जिंकून येण्याची क्षमता असणारे पदाधिकारी यांना भाजपमध्ये मुक्त प्रवेश देण्याचे धोरण ठेवले होते. खडसे यांना दूर ठेवून सत्ता मिळविता येते हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे खडसेही दुखावले.
जे खडसे करू शकले नाहीत, ते गोटे यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या नियोजनातून डावलल्याचे स्पष्ट झाल्यावर गोटे यांनी शांत न बसता आकाशपाताळ एक करण्यास सुरुवात केली. संरक्षण राज्यमंत्र्यांपासून ते जलसंपदा आणि पर्यटनमंत्र्यांपर्यंत अशा सर्वावर त्यांनी शाब्दिक हल्ले चढविले. भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींना पावन केले. निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी कार्यालय थाटल्यावर गोटे यांनी दुसरे समांतर कार्यालय सुरू केले. या घडामोडी विरोधी पक्षांसह भाजपसाठी डोकेदुखी ठरल्या. विकासकामात विरोधकांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडथळ्यांविषयी ते नेहमी बोलतात. जोरकस प्रचारातून धुळे नगरपालिकेवर सत्ता मिळविल्यानंतर गोटे सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे गोटे यांनी जाहीर केले आहे. भाजपमधील धुळवडीने काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांच्या राजकारणाची नव्याने आठवण करून दिली आहे.
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि गोटे यांच्यात सुरुवातीपासूनच बेबनाव आहे. भामरे यांना २०१४च्या निवडणुकीत धुळे मतदारसंघातून उमेदवारी देण्यास गोटे यांनी विरोध केला होता. भामरे यांचे काम करणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. नंतर गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी केल्यावर गोटे यांनी भामरे यांना साथ दिली होती.
अनिल गोटे