विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष करून  दहशतवादाची बीजे रोवणाऱ्या येथील लोकप्रतिनिधींची ही कृती दुर्दैवी असून, आपल्या पदाचा दुरुपयोग करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी आमदार बाळ माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांचे नाव न घेता केला. या वेळी त्यांनी राज्य व केंद्रातील काँग्रेसप्रणीत आघाडीची सरकारे कोटय़वधींच्या घोटाळ्यात व भ्रष्टाचारात अडकली असून, ही सरकारे सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरली असल्याची टीकाही केली.
येथील हॉटेल व्यंकटेशमध्ये भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, जि. प. सदस्य सतीश शेवडे, ज्येष्ठ नगरसेवक अशोक मयेकर, जिल्हा सरचिटणीस अविनाश साटम, शहर अध्यक्ष संजय पुनसकर आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष वहाळकर यांनी बोलताना सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वासाने सोपविलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडीन, अशी ग्वाही देतानाच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे एक मोठे आव्हान पक्षासमोर उभे आहे. या निवडणुकांना समर्थपणे सामोरे जाता यावे यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून पक्षाला ताकद मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पाली हातखंबा व निवळी या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या ७-८ वर्षांत राजकीय दहशतवाद मोठय़ा प्रमाणात वाढला असून, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यापासून अगदी मारहाण करण्यापर्यंतच्या घटना वाढल्या आहेत. मतदारसंघाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, ‘भलत्याच क्षेत्रा’त नाक खुपसून स्वत:चीच पाठ थोपटून घेणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला लाभावेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे माने म्हणाले. मच्छीमारांच्या डिझेलचा प्रश्न असो अगर आंबा बागायतदारांना द्यावयाच्या नुकसानभरपाईचा प्रश्न असो, सध्याचे राज्य व केंद्रातील आघाडी सरकार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’, असल्याची टीकाही माने यांनी केली.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे शिवशाही सरकार सत्तेत असताना रत्नागिरी जिल्हा परिषद, तसेच नगर परिषदेला विनासायास निधी मिळत होता; परंतु आता रनप व जिपमध्ये युतीची सत्ता असल्याने राज्य सरकार विकास कामांकरिता निधीच देत नसल्याचा आरोप माने यांनी केला.
काही दिवसांपूर्वी हातखंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारी प्रकरणात माजी आमदार बाळ माने यांच्यासह भाजपच्या आठजणांना न्यायालयीन कोठडीत जावे लागले होते, तर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना मात्र त्याच दिवशी जामिनावर सोडण्यात आले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक कट्टे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही माने यांनी टीका केली.
 वाली, हातखंबा व निवळी परिसरात बेकायदा व्यवसाय सुरू असून यातून मिळणाऱ्या अतिरिक्त पैशाच्या जोरावरच हा दहशतवाद माजला असून, त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा पुनरुच्चारही माने यांनी शेवटी केली.