केंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून केवळ फसव्या घोषणा दिल्या, एकही आश्वासन पूर्ण केले नाही, राज्यात पुन्हा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतरच महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकाचे राज्य होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोपरगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केले.

कोपरगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा नेते आशुतोष काळे, महिला जिल्हाध्यक्ष मंजूषाताई गुंड, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, युवती जिल्हाध्यक्ष अमृता कोळपकर, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती सुळे म्हणाल्या की, इंधनाचे दर वाढवणारे, शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचे नळकांडे फोडणाऱ्या सरकारचे हेच का अच्छे दिन असा प्रश्न आज प्रत्येक नागरिक विचारू लागला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की, पसंत असलेली मुलगी दाखवा मी उचलून आणतो. पुरोगामी महाराष्ट्रात असे बोलायची हिंमत कशी होते. महिला, मुलींच्या बाबत काढलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाही. मी जर मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तत्काळ आ. राम कदम यांचा राजीनामा घेतला असता, हातातून सत्ता गेली तरी चालेल पण महिलांचा मानसन्मान, आदर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आशुतोष काळे बोलताना म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे तालुका विकासात १० वर्ष पिछाडीवर गेला असून तालुक्यात विकास ठप्प झाला आहे. दुस-यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यात व उद्घाटन करण्यात तालुक्याच्या लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधीमुळे तालुका दहा वर्षे पाठीमागे गेला आहे. विद्यमान सरकारच्या लोकप्रतिनिधींनी महिलांबद्दल अपशब्द वापरला त्याचा कोपरगावच्या महिला लोकप्रतिनिधींनी साधा निषेध व्यक्त केला नाही ही महिला भगिनीच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची गोष्ट असल्याचे सांगितले. सुळे यांनी शेतकरी, व्यापारी, महिला, डॉक्टर, वकील, इंजिनिअर व समाजातील विविध घटकांतील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी व प्रश्न समजावून घेतले.

Story img Loader