स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शाळांपैकी उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या राज्यातील १०० जुन्या शाळांना राज्य सरकारने प्रत्येकी १० लाखांचे विशेष अनुदान जाहीर केले. यात येथील प्रतिभा निकेतन हायस्कूलसह औरंगाबादच्या स. भु. शिक्षण संस्थेच्या दोन शाळांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाचा या बाबतचा शासन निर्णय ३ मार्चला निघाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने शंभर शाळांना ही अभिनव भेट दिली. या अनुदानासाठी शाळांची निवड करताना विद्यार्थीसंख्या, निकालाची परंपरा, एकंदर कामकाज आदी बाबी विचारात घेण्यात आल्या. हे अनुदान विद्यार्थीहित, तसेच शाळांच्या सर्वागीण विकासासाठी शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा व ग्रंथालय सुसज्ज करणे आदी बाबींवर खर्च करावे, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले. अनुदानाची रक्कम संबंधित शाळांना दोन हप्त्यांत दिली जाणार आहे.
नांदेड जिल्ह्य़ातून प्र. न. शिक्षण संस्थेची प्रतिभा निकेतन हायस्कूल ही एकमेव शाळा अनुदानास पात्र ठरली. ही शाळा १९३९मध्ये सुरू झाली. आता ती अमृतमहोत्सवी वर्षांत असून, उत्कृष्ट निकाल व दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सर्जे गुरुजी, प्र. तु. शास्त्री, नरहर कुरुंदकर यांनी या शाळेचा लौकिक वाढविला. आज या शाळेत सुमारे साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे सांगून संस्थेचे अध्वर्यू (सरचिटणीस) प्रा. स. दि. महाजन यांनी विशेष अनुदानाबद्दल समाधान व्यक्त करून सरकारचे आभार मानले. अमृतमहोत्सवी वर्षांत शाळेतील सोयी-सुविधा अधिक चांगल्या दर्जाच्या करता येतील, असेही त्यांनी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माहेश्वरी, उपाध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, कोषाध्यक्ष एच. एन.पाटील तसेच प्रा. चालिकवार, आर. के. पाठक, अॅड. शिरीष नागापूरकर व शाळेतल्या शिक्षकवंृदानेही समाधान व्यक्त केले.
औरंगाबादच्या स. भु. शिक्षण संस्थेच्या स. भु. प्रशाला व शारदा मंदिर कन्या प्रशाला या दोन शाळांसह १९४६मध्ये स्थापन झालेले मराठा हायस्कूल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरू केलेले अंबाजोगाईचे योगेश्वरी विद्यालय, सेलूचे नूतन विद्यालय तसेच लातूरचे मारवाडी-राजस्थान विद्यालय या शाळांचाही यात समावेश आहे. विभागात जि. प.च्या ३ शाळा अनुदानास पात्र ठरल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा