सातारा शहराचा १९७१ पासून प्रलंबित असलेला हद्दवाढीच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सातारा पालिकेच्या हद्दवाढीची अंतिम अधिसुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपुर्द केली.
सातारा शहरानजीकची उपनगरे शहरात यावीत यासाठी सातत्याने लाेकप्रतिनिधीं म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कायम पाठपूरावा सुरु ठेवला हाेता, अखेर त्यास यश आले आहे. राज्य शासनाने सातारा शहराची हद्दवाढीचा निर्णय घेतल्याने साताऱ्याच्या पालिकेची महापालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला.
सातारा पालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमुळे पालिकेचे क्षेत्र ८.७ चौरस किलोमीटरवरून सुमारे १२ चौरस किलोमीटर इतके होणार आहे. पालिका हद्दीतील शहराची लोकसंख्या २०११ च्या जणगननेनुसार एक लाख २९ हजार असून, त्यात हद्दवाढीमुळे आणखी सव्वा लाखांहून अधिक लोकसंख्येची भर पडणार आहे. हद्दवाढीमुळे शेजारची उपनगरे साताऱ्यात येणार असल्याने शहर विकासाला चालना मिळणार आहे.
सातारा शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेकडील भाग व त्या क्षेत्रातील त्रिशंकू भाग व ग्रामपंचायती नव्या हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.पुर्वी अजिंक्यतारा किल्ला पालिकेच्या हद्दीबाहेर होता. आता संपूर्ण किल्ला, तसेच महादरे गावचा यवतेश्वर डोंगराच्या हद्दीपर्यंत सर्व भाग हा पालिका हद्दीतील क्षेत्रात सामावला जाणार आहे.
या हद्दवाढीत करंजे, खेड, दरे खुर्द, कोडोली, गोडोली असा परिसरचा सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. खेड व कोडोली परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेकडील क्षेत्राचा समावेश झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीला तत्त्वतः मान्यता दिली होती. त्याच वेळी सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निकाली लागला होता. पण पुढे शासकीय लालफितीत हद्दवाढीची फाईल अडकली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सातारा शहराच्या हद्दवाढीच्या आशा धुसूर झाल्या असतानाच, मागील अनेक वर्षांपासूनच्या खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश आले. साताऱ्याचे माजी आमदार स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनीही त्यांच्या कारकिर्दीत हद्दवाढीबाबत पाठपुरावा केला होता. त्यात शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश आले. शाहूपुरी आणि गेंडामाळ येथील भाजपा कार्यकर्त्यांचा या हद्दवाढीला विरोध होता. मात्र भाजपा आमदारांनीच हद्दवाढीला मंजुरी आणली. सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीची अंतिम अधिसुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपुर्द केली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याच्या निर्णयाचे शहरातील नागरिकांनी मोठे स्वागत केले. मोती चौकात नगरसेवकांकडून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात येणार आहे.
शहर विकासाला मिळणार चालना मिळणार –
”सातारा शहरालगतचा त्रिशंकू भाग नागरी सुविधांपासून वंचित होता. त्याला या हद्दवाढीने न्याय देता आला. प्रस्तावित हद्दवाढीमुळे पालिकेचे क्षेत्र व शहराच्या लोकसंख्येत भर पडू शकते. शहरातून जाणाऱ्या पुणे- बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेकडील वेण्णा नदी पर्यंतचा भाग व त्या क्षेत्रातील त्रिशंकू भाग व ग्रामपंचायती नव्या हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.पुर्वी अजिंक्यतारा किल्ला पालिकेच्या हद्दीबाहेर होता. आता संपूर्ण किल्ला, तसेच महादरे गावचा यवतेश्वर डोंगराच्या हद्दीपर्यंत सर्व भाग हा पालिका हद्दीतील क्षेत्रात सामावला जाणार आहे. हद्दवाढ मुळे शेजारची उपनगरे साताऱ्यात येणार असल्यामुळे शहर विकासाला मिळणार चालना मिळणार आहे.” असे शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार,सातारा