जगण्याचे सर्व मार्ग बंद होतात. अन्य कोणताच पर्याय उरत नाही, अशा वेळी शेतकरी आत्महत्येकडे वळतो. सरकारने शेतकऱ्याला जगण्यास आधार मिळेल असे पर्याय कधीच उपलब्ध केले नाहीत. मग शेतकरी कसा जगेल, असा सवाल माजी आमदार तथा भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला.
उस्मानाबादेत आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संजय िनबाळकर, अनिल काळे यांची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, की मागील वर्षांत दुष्काळ होता. यंदा खरिपाला अतिवृष्टीने झोडपले आणि रब्बी हंगाम गारपिटीच्या तडाख्यात सापडला. आता पुढच्या वर्षी कमी पाऊस होईल, म्हणजे दुष्काळच असे शास्त्रज्ञ सांगतात. अशा दुष्टचक्रात शेतकरी टिकावा, जगावा म्हणून सरकारने गांभीर्याने काहीच उपाययोजना आखल्या नाहीत. परिणामी, एकटय़ा उस्मानाबाद जिल्ह्यात १५ शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करला. मात्र, या आत्महत्या नसून संवेदनाहीन सरकारने केलेल्या हत्या असल्याचा आरोपही पटेल यांनी केला.
दिल्लीला शेतीतील काही कळतं, मुंबईची शेतीबाबत काही करण्याची इच्छा नाही. अशा वेळी धास्तावलेल्या, आर्थिक पेचात अडकलेल्या शेतकऱ्यांनी जायचे तरी कुठे, असा सवालही त्यांनी केला. बाजारात आज कमी भावाने सरकारच परदेशातून अन्नधान्य आयात करीत आहे. त्यांच्यावर आयात शुल्क बसविण्याऐवजी आमच्या मालाला निर्यातबंदी घातली जात आहे. चारही दिशांनी शेतकऱ्याला हे सरकार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्महत्यांचे कारण आर्थिक असल्याचे सरकार कधीच सांगत नाही. वास्तव झिडकारून कृषी व्यवस्थेला लागलेला हा महारोग किती दिवस लपविणार? आमचा शेतकरी वैतागून मेला हे कधीतरी मान्य करा, असेही ते म्हणाले.
लोकशाही आर्थिक व सामाजिक क्षेत्रात विकेंद्रित व्हायला हवी, अन्यथा लोक घटना जाळतील, असा इशाराही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. राज्य व केंद्र सरकारच्या संवेदनाशून्य कारभारामुळे आज मात्र अशी अवस्था निर्माण झाल्याचेही पटेल यांनी म्हटले. देशातील निम्म्या जिल्ह्यांत नक्षलवाद व उर्वरित जिल्ह्यांत जातीयवाद आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय न पोहोचल्याचे हे बोलके चित्र आहे. त्यासाठी आता या सरकारला हद्दपार करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही पटेल यांनी सांगितले.
आमच्यासाठी ही शेवटची आशा आहे. यंदा विजय मिळविणारच. महायुतीच्या वाटेत कोणीही आडवा आला, तरी प्रसंगी त्याला तुडवून पुढे जाऊ, अशा शेलक्या शब्दांत रोहन देशमुख यांच्या बंडखोरीचा त्यांनी समाचार घेतला. मागील निवडणुकीत खूप कमी फरकाने प्रा. गायकवाड यांचा पराभव झाला. ती कसर यंदा भरून काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आवाहन करणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा