सोलापूर : शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून पारंपारिक पिकांऐवजी कमी संसाधनात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन पिकांचे प्रयोग शेतात राबवावेत. तुती लागवड किंवा रेशीम उत्पादन हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आला असून त्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. राज्य शासनही रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूरजवळ रेशीम कोष बाजारपेठ अर्थात रेशीम पार्क इमारत उभारण्यात आली आहे. त्याच्या लोकार्पणाचे औचित्य साधून आयोजित रेशीम उत्पादक शेतकरी कार्यशाळेमध्ये पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, रेशीम उद्योग विभागाच्या उपसचिव श्रध्दा कोचरेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रकाश महानवर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : डॉ. अरुणा ढेरे यांना जीवन सन्मान पुरस्कार जाहीर

हिरज येथील रेशीम बाजारपेठेमुळे सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील अन्य जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे. शासनही महारेशीम अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये तुती लागवडीबाबत जागृती करीत आहे. जिल्ह्यासह राज्यातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या अनुषंगाने प्रलंबित असलेले प्रस्ताव शासन स्तरावरून त्वरित निकाली काढण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. शासन खंबीरपणे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : बारामतीत आता काका-पुतण्या थेट लढत होणार? विधानसभेच्या उमेदवारीवरून युगेंद्र पवारांचं सुचक वक्तव्य!

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील वातावरण डाळींब व रेशीम उत्पादनासाठी पोषक आहे. रेशीम अनुदानाचे प्रलंबित प्रस्ताव लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत रेशीम उद्योगास चालना मिळण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनीही मनोगत मांडले. यावेळी रेशीम उद्योग पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी प्रास्ताविक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government committed to boost silk industry of solapur says bjp leader chandrakant patil css
Show comments