|| प्रसेजनीत इंगळे
मोठे सरकारी रुग्णालय नाही:- वसई विरार महापालिकेने आरोग्य सेवा मोफत केली आहे. आरोग्य सेवा मोफत देणारी वसई-विरार ही पहिली महापालिका ठरली आहे. मात्र नालासोपारा मतदारसंघात उत्तम आरोग्य सेवा देणारी यंत्रणा नाही. मागील निवडणुकीत आरोग्य सेवा सुधारण्याचे आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते; परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याची परवड अजूनही तशीच सुरू आहे.
तालुक्यात कोणतेही मोठे सरकारी रुग्णालय नसल्याने इलाजासाठी आजही मुंबईला जावे लागत आहे. शहरात कोणतेही शासकीय चिकित्सा केंद्रसुद्धा मागील ३० वर्षांत उभारण्यात आले नाही. मागील निवडणुकीच्या वेळेस सत्ताधारी आमदार क्षितिज ठाकूर यांनी लवकरच अद्ययावत रुग्णालये उभारण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही त्याची मुहूर्तमेढ रोवलीच नाही.
सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने २०१४ च्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वसई विरारमधील विविध ठिकाणी आरोग्य चिकित्सा केंद्रे उभारण्याचे आश्वासन दिले होते.
यात सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या, सोनोग्राफी, एक्स रे, एमआरआय, सिटी स्कॅन अशा सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण मागील पाच वर्षांत असे केंद्र अजूनही उभारण्यात आले नाही.
वसई विरार शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात असताना केवळ महापालिकेकडे तुळिंज रुग्णालय (नालासोपारा) आणि सर डीएम पेटीट (वसई) अशी दोन रुग्णालये आहेत. या दोनही रुग्णालयांत सेवा-सुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळत आहे. या दोन्ही रुग्णालयांत सर्वच कर्मचारी, डॉक्टर ठेक्यावर काम करीत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. सध्या रुग्णालयात पूर्ण वेळ डॉक्टर नाहीत, यंत्रे काम करत नाहीत, सिटी स्कॅन मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे.
यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन अधिक पैसे खर्च करावे लागतात. तसेच अपघात आणि दुर्धर आजारावर कोणत्याही सुविधा नाहीत. त्यासाठी मुंबई गाठावी लागते. महापालिका रुग्णालयात काही सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, पण त्या नाममात्र आहेत.
रोजगारनिर्मिती कागदावरच
ल्ल वसई विरार महापालिका क्षेत्रात २० लाखांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ४० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. राजकारण, समाजकारण, क्रीडा तसेच नोकरी शेत्रात त्यांचा मोठा वाटा आहे. असे असतानाही केवळ पालिकेच्या आकडेवारीनुसार केवळ ६०० महिला छोटय़ा-मोठय़ा उद्योजिका आहेत. महिला रोजगाराचा प्रश्न वसई-विरारमधील महिलांना सतावत आहे. रोज जिवावर उदार होऊन त्यांना मुंबईचा प्रवास करावा लागत आहे. वसई-विरारमध्ये रोजगारनिर्मिती झाल्यास त्यांचा हा प्रवास वाचणार आहे.
ल्ल बहुजन विकास आघाडीने २०१४ च्या जाहीरनाम्यात ८० हजार महिलांना रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारनिर्मितीसाठी मदत करणार हा मुद्दा ठेवला होता. त्यासाठी महिला उद्योजकांची नोंदणी करून त्यांच्यासाठी वसई-विरारमध्ये विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रांची उभारणी केली जाणार असून अनेक छोटे-मोठे प्रकल्प राबवून महिलांना रोजगार उपलब्ध केला जाणार होता. पण तेवढय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली नाही. कोणतेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. वसई विरार महापालिकेने या वर्षी महिला बालकल्याण विभागासाठी २३ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. पण कोणताही रोजगार प्रकल्प उभारण्याची योजना महापालिकेकडे नाही.
ल्ल वसई विरार पालिका महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महापालिकेकडे नोंदणीकृत ८०० हून अधिक महिला बचत गट आहेत. या बचत गटांना रोजगार प्रशिक्षण दिले जाते. महापालिका काही व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देते तसेच बचत गटांना व्यावसायिक अनुदानही देते. पण बाजारपेठ नसल्याने त्यांच्या उत्पादित मालाला ग्राहक नसल्याने अनेक उद्योग बंद पडले. तसेच काही ठिकाणी भांडवल नसल्याने प्रशिक्षण घेतलेल्या महिला आजही बेरोजगार आहेत.