महाराष्ट्र राज्यातील २७ फळांची लाकडी खेळण्याच्या माध्यमातून जोपासना करणाऱ्या सावंतवाडी शहराचे नाव जगप्रसिद्ध झाले. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या सावंतवाडी संस्थान काळात शहरात लाकडी खेळण्यांना राजाश्रय मिळाला. आज या लाकडी खेळण्यांसाठी मोठी मागणी आहे. चीनची या खेळण्यात घुसखोरी ही चिंतेची बाब आहे.
सावंतवाडी संस्थानच्या राजांनी लाकडी खेळण्यांना राजाश्रय दिला. त्यासाठी खास कारागीर असणाऱ्या चितारी लोकांना आपल्या राज्यात आणून लाकडी खेळण्याचे संवर्धन करविले. संस्थानच्या राजांची ही चौफेर दृष्टी आजच्या लोकशाहीतील राज्यकर्त्यांना नाही. लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी जगप्रसिद्ध आहे.
सावंतवाडीचे भूपती बापूसाहेब महाराजांनी या संस्थानात लोककल्याणकारी राज्य केले. संस्थानचे राजे श्रीमंत शिवरामराजे भोसले व त्यांच्या पत्नी सौ. सत्त्वशीलादेवी भोसले यांनी हस्तकलेला प्राधान्य दिले. श्रीमंत शिवरामराजे भोसले संस्थान विलीन झाले. नंतरच्या काळात २५ वर्षे आमदार म्हणून विजयी झाले. त्यांनी हस्तकला जगभर नेली. राज्याच्या हस्तकला महामंडळाचे ते अध्यक्षही होते.
सावंतवाडी संस्थानने लाकडी खेळणी व हस्तकलेस राजाश्रय दिला. आजही राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले लाकडी खेळणी, गंजीफा, विविध प्रकारच्या हस्तकला वस्तू बनवितात. त्यासाठी राजवाडय़ात कामगारही नेमले आहेत. या कारागीरांना राजमाता खास मार्गदर्शन करतात. देश-विदेशात मागणी असणाऱ्या गंजीफाचे जतन त्यांनी करून ठेवलेले आहे.
सावंतवाडी संस्थानने हस्तकलेस राजाश्रय दिला. त्यामुळे हस्तकला फुलत गेली, पण स्वातंत्र्योत्तर काळात याकडे सत्ताधारी राजकीय नेत्यांनी डोकावून पाहिले नाही. आज कारागीरही कमीच आहेत. हस्तकलेला उद्योग धोरणात सामावून घेऊन लोकशाहीत राजाश्रय मिळाला असता तर लाकडी खेळणी, कारागीर संख्या वाढली असती. सुमारे २५ ते ३०हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता.
लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी जगप्रसिद्ध आहे. राज्यातील आंबा, काजू, पेरू, केळीफणा, जांभ, सीताफळ, डाळिंब, दोडके, शेवग्याची शेंग, मिरची, वांगे, पडवळ, संत्र, भेंडी, पपनस, कारले, मावळंग, कलिंगड, चिबूड, पपई, मुळा, ऊस, सफरचंद, लाल भोपळा, सफेद भोपळा, काकडी, रामफळ या २७ फळांचा एक सेट असतो. हा सेट लाकडापासून बनविला जातो. सुरुवातीला १०० रुपयांत मिळणारा हा लाकडी खेळण्याचा सेट ८५० रुपयांना मिळतो.
याशिवाय श्रीफळ, पाट, लाटणे, लहान मुलांना खेळणी, भातुकली अशा अनेक हस्तकलेच्या नमुना ठरणाऱ्या लाकडी वस्तू सावंतवाडीच्या बाजारपेठेत मिळतात. पांगिरा जातीचे झाड दुर्मीळ होत चालले असल्याने कागदी लगदा व लाकडाच्या भुशापासूनही खेळणी बनविली जात आहेत.
शासनाने पर्यावरणाचा समतोल ढासळणारी सामाजिक वनीकरणमार्फत ऑस्ट्रेलियन बाभूळ, गुलमोहरसारखी विविध झाडांचे वृक्षारोपण केले, पण प्रत्यक्षात लाकडी खेळण्याकरिता उपयुक्त ठरणारे पांगिरा झाडाचे वृक्षारोपण व संवर्धनाकडे लक्ष दिले नाही हे आमचे दुर्दैव आहे.
कर्नाटक, केरळ व अन्य राज्यांत हस्तकला महामंडळे आहेत, पण महाराष्ट्र सरकारने हस्तकलेला प्राधान्य दिले नाही याची खंत सावंतवाडीच्या लाकडी खेळणी बनविणाऱ्या चितारी, काणेकर यांनी व्यक्त केली. हस्तकलेला उद्योगात प्राधान्य देऊन प्रशिक्षण दिले गेले असते तर हा उद्योग आणखी भरभराटीला आला असता. शिवाय या ठिकाणी तयार झालेली खेळणी देश-विदेशात पोहोचविण्याची गरजही आहे.
चीनच्या खेळण्यांमुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांवर परिणाम झालेला नाही, असे काणेकर यांनी म्हटले आहे. पूर्वी हाताने लाकडी खेळणी रंगविली जात, आता वॉर्निस केले जाते. पूर्वी रंगात बळू घातला जात होता, पण आज ती जागा अद्ययावत रंगांनी घेतली आहे.
लग्नसमारंभ, गौरी-गणपती सणाच्या काळात लाकडी वस्तूंना मागणी आहे. गणपतीच्या मातीला लाकडी खेळणी तर लग्नसमारंभात पाट व अन्य वस्तूंना मागणी असते. गोवा राज्यासह कर्नाटकातही सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना मागणी आहे.
सावंतवाडी लाकडी खेळणी बनविण्याचे कारखाने आहेत. आज कारागीर मिळत नसल्याने थोडी अडचण येत आहे, हीच परिस्थिती राहिली तर पुढील दहा वर्षांत लाकडी खेळणी बनविण्याच्या उद्योगावर परिणाम होण्याची भीती आहे.
सावंतवाडीत लाकडी खेळणी खरेदीसाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. त्यांना मनसोक्त खेळणी देण्याचे काम सावंतवाडी करीत आली आहे, पण या लाकडी खेळण्यांच्या हस्तकलेला उद्योगाचा सन्मान मिळवून देण्याची गरज आहे. उद्योगाचा सन्मान मिळवून देताना लोकशाहीचा राजाश्रय मिळाला पाहिजे. शिवाय हस्तकलेचे संवर्धन व संरक्षण होण्यासाठी उद्योग खात्याने खास प्रशिक्षण देण्याची तयारी ठेवली पाहिजे.
लाकडी खेळणी किंवा वस्तूंना जगभर बाजारपेठ असताना महाराष्ट्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच काळाच्या पडद्याआड हस्तकलेस नेण्याचे प्रकार आहे, असे कारागीर मानतात. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्याच्या हस्तकलेचे संवर्धन व संरक्षण होण्यासाठी खासदार, आमदार, मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा