लोकसत्ता वार्ताहर
सावंतवाडी : महाराष्ट्रात एआय चा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना एआय चे ज्ञान मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून टप्प्याटप्याने एआय चा वापर सर्वच क्षेत्रात करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रात बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर,जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले,प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, आंबोली सरपंच सविता पालेकर ,माजी आमदार राजेश पाटील ,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सावळाराम अणावकर, प्रफुल्ल सुद्रिक, सुरेश गवस,उदय भोसले, मनोहर साटम, संदीप राणे आदि उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,मागच्या वेळी मी कोल्हापूर दौऱ्यावर आलो होतो त्यावेळीच आंबोली ला यायचे निश्चित केले होते.येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्राची पाहाणी करून काहि निर्णय घ्याचे आहेत असा माझा प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.तसेच यावेळी त्यांनी एआय बाबत आपली भुमिका मांडली सर्वच क्षेत्रात एआय चा वापर टप्प्याटप्याने करण्यावर सरकार चा भर आहे.शेतकऱ्यांनी एआय चे ज्ञान आत्मसात केले पाहिजे भविष्यात ऊस फळबागा या एआय पध्दतीने विकसित करण्यात येणार असून अर्थसंकल्पात ही एआय ला भरघोस तरतूद करण्यात आली असून या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी होणार असल्याचे ही पवार यांनी स्पष्ट केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्र या ठिकाणी बैठक झाल्यानंतर अजित पवार म्हणाले, या ठिकाणी ऊस प्रजनन केंद्राला पायाभूत सुविधांबाबत माहिती घेतली. अजित पवार यांनी आंबोली व गेळे या दोन ठिकाणी पाणी, पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेतली. याबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा केली.