राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उघडले जाणार असून गोंदिया, चंद्रपूर व बारामतीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
गोंदिया जिल्ह्य़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा मुद्दा आमदार गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. २८ सप्टेंबर २०१२ रोजी राज्य शासनाने गोंदिया, चंद्रपूर व बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबातची सूचना केंद्र सरकारकडे पाठविली, परंतु अद्यापर्यंत ही महाविद्यालये का सुरू झालेली नाहीत, याबाबत या सदस्यांनी शासनाकडे लक्षवेधी सूचनेतून विचारणा केली.
गोंदियाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबातच २००९ मध्ये विधिमंडळात घोषणा करण्यात आली होती. या घोषणेच्या अनुषंगाने १४ एप्रिल २०१२ ला संचालकांकडून सक्षमता तपासणी अहवाल शासनास प्राप्त झाला. बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा अहवाल २४ एप्रिल २०१२ रोजी तर चंद्रपूरसाठीचा अहवाल १९ जून २०१२ ला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडून प्राप्त झाला. उपरोक्त तीनही महाविद्यालये व रुग्णालये सुरू करण्याबाबत वित्त व नियोजन विभागाचे अभिप्राय प्राप्त झाले असून महसूल विभागाकडून जमिनीचा आगाऊ ताबा घेण्याच्या सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वीच या महाविद्यालयांबाबत निर्णय घेतला जाईल, असे डॉ. गावित म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्य़ातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केली. बारामती तालुक्यात जर ोथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असेल तर अचलपूरलाही द्यावे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली. यावर डॉ. गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयांबाबत सरकारची सकारात्मक भूमिका असून लोकप्रतिनिधींच्या मागण्या विचारात घेतल्या जातील, असे उत्तर दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा