महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत शासनाने तंटामुक्त ठरवलेली गावे आणि १९० हून अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना शांतता पुरस्काराने सन्मानित केले असले तरी ज्या गावांनी तंटे मिटविण्यात सातत्य राखले, त्यांना विशेष पुरस्कारापासून वंचित ठेवल्याचे पुढे आले आहे. मोहिमेचे सहावे वर्ष पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असून आतापर्यंत गत पाच वर्षांच्या कालावधीत एकाही गावास हा पुरस्कार दिला गेला नाही. मोहिमेच्या मार्गदर्शक तत्त्वात खुद्द शासनाने निश्चित केलेला हा पुरस्कार जाहीर न करण्यामागील कोडे अजूनही कायम आहे.
गावासाठी गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तोडगा घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची संकल्पना मांडली आहे. त्या अंतर्गत गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविणे आणि दाखल असलेले व नव्याने निर्माण होणारे तंटे तडजोडीने मिटविण्याचा प्रयत्न करणे, गावात जातीय व धार्मिक सलोखा राखणे, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आदी निकष पूर्ण करणाऱ्या गावांना तंटामुक्त गाव म्हणून जाहीर केले जाते. तंटामुक्त झालेल्या प्रत्येक गावास लोकसंख्येच्या आधारावर रोख पुरस्कार दिला जातो. तसेच १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी अधिकची रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. एकदा पुरस्कार प्राप्त केलेल्या गावांना पुन्हा पुरस्कार दिला जात नाही. तथापि, त्या गावांनी पुढील वर्षांत तंटे मिटविण्यात सातत्य राखल्यास त्यांना ‘विशेष पुरस्कार’ देण्याचे शासनाने म्हटले आहे.
मोहिमेच्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास राज्यातील एकूण १६,००४ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली, तर १९० हून अधिक गुण मिळविणाऱ्या १२२३ गावांची शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. म्हणजे, प्रत्येक वर्षी शासनाने तंटामुक्त गाव आणि शांतता पुरस्कार मिळविणाऱ्या गावांची यादी जाहीर केली. परंतु ज्या गावांनी तंटे मिटविण्यात सातत्य राखले, त्यांना आधी कबूल केल्याप्रमाणे विशेष पुरस्कार देण्यात आलेला नाही. वास्तविक, या मोहिमेत एकदा पुरस्कार मिळविणाऱ्या गावांना पुन्हा पुरस्कार दिला जात नाही. परंतु पुरस्कार मिळविणाऱ्या गावांनी पुढील वर्षांत तंटे मिटविण्यात सातत्य राखल्यास त्यांना विशेष पुरस्कार देण्याविषयी राज्यस्तरीय समिती विचार करते. मागील पाच वर्षांत राज्यस्तरीय समितीने त्याचा विचार केला की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुरस्कार मिळविणारी गावे पुढील काळातही तंटे मिटविण्यात सातत्य राखतात, परंतु त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला जात नसल्याने त्यांच्यात नैराश्याचे वातावरण आहे. शासनाने या गटातील पुरस्कार जाहीर केले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही मान्य केले.