विदर्भातील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर पूरग्रस्तांची कड घेऊन राजकीय पक्षांच्या आंदोलनांना वेग आला आह़े त्यातच नेत्यांकडून पूरग्रस्त भागांच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या दबावामुळे तहसीलदार आणि तलाठी चांगलेच भरडले जात आहेत.
चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांना पूरग्रस्तांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. यात शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी मंगळवारी देवतळेंच्या राजीनाम्याची मागणी करून संतापात आणखी भर घातली. गडचिरोलीचे पालकमंत्री आर.आर. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यातच भाजपने बुधवारी वर्धा बंदचे आवाहन केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून भाजप कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील पावसाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची पुरती ऐसीतैशी केली. त्यांनी जिल्ह्य़ातील सर्वेक्षण नव्याने करण्याच्या वेगळ्या सूचना दिल्याने अधिकाऱ्यांची पंचाईत झाली असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव आला आहे. अनेक जिल्ह्य़ांमधील शेते अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे सर्वेक्षणासाठी तेथवर पोहोचावे कसे, हा यक्षप्रश्न यंत्रणेला भेडसावत आहे. गेल्या ३१ जुलैपर्यंत झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या १० ऑगस्टपर्यंत सादर करावयाचा असल्याने जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच तहसीलदार आणि तलाठय़ांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

Story img Loader