लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : सांगलीत हळद संशोधन उपकेंद्र उभारण्यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत बैठक घेतली जाईल. तसेच संरक्षण क्षेत्रातील एखादा उद्योग सांगलीत सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्यावतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. जयंत पाटील, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष ललित गांधी, नीता केळकर, दीपक शिंदे, रवींद्र माणगावे, रमाकांत मालू आदि मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.
उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले, हळदनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. सांगली एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, दिवा बत्ती व पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. या सुविधासाठी महापालिका, नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करावा लागेल. सातारा जिल्ह्यातील म्हसवड व त्या परिसरातील जमीन संपादित करून ही एमआयडीसी झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात फार मोठी औद्योगिक क्रांती होवू शकते असे ते म्हणाले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, उद्योगासाठी मनुष्यबळाची गरज आहे. जिल्ह्यातील उद्योग जगत व प्रामुख्याने पॉलिटेयिनक इंजिनिअरींग यांनी परस्पर समन्वयाने बैठक घेऊन आवश्यक मनुष्यबळ विकसीत करण्यासाठी अभ्यासक्रम विकसीत करावेत.यावेळी आ. पाटील यांनी मोठा उद्योग जिल्ह्यात आला तर किमान 25 ते 30 हजार छोटे, मोठे उद्योजक तयार होतील. परराष्ट्रातील गुंतवणुकीचा काही भाग सांगलीतील उद्योगासाठी वापरता येईल असे सांगितले.