ज्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धांच्या विरोधात लढा दिला आणि समाजातील सामान्य माणसांच्या मनात आत्मविश्वासाचा अंकुर पेरला, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबत पुण्याचे पोलीस भविष्याच्या दृष्टिकोनातूनही विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याचे कारणही एक जोतिषीच असल्याने या चर्चेचे पेव फुटायला फारसा वेळ लागला नाही. डॉ. दाभोलकरांचे खुनी पकडण्यासाठी माझा सल्ला घेतला जात आहे, असा अपप्रचार पुण्यातील एका ज्योतिषाकडून सध्या सुरू असल्याने पुणे पोलीस अडचणीत आले आहेत.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला शुक्रवारी एक महिना पूर्ण होईल. पुणे पोलिसांची तेवीस पथके, तसेच मुंबई पोलिसांचे पथक या हत्येचा तपास करत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या चळवळीने अनेक संस्था-संघटना, जातपंचायती, तसेच व्यावसायिक दुखावले असणार ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अशा सर्वाकडे देखील हत्येबाबत कसून चौकशी केली आहे. त्याच दृष्टिकोनातून पुण्यातील काही प्रसिद्ध ज्योतिषी, तसेच विविध समस्या-प्रश्नांवर उत्तरे व सल्ला देणारे बुवा-बाबा, मांत्रिक यांनाही पोलिसांनी आयुक्तालयात बोलावून त्यांचीही वेळोवेळी चौकशी केली आहे.
पोलीस आयुक्तालयात एका जोतिषालाच हिंडताना पाहिल्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली. खरे म्हणजे हत्येच्या तपासाचा एक भाग म्हणून त्या जोतिषाला पोलीस आयुक्तालयात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याने स्वत:च याबाबत खुलासा करताना आपला सल्ला घेतला जात असल्याचे सांगितले. या अपप्रचारामुळे पोलिसांची चांगलीच अडचण झाली आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासाचा भाग म्हणून जी चौकशी करण्यात आली त्यातून वेगळीच माहिती हितसंबंधीयांकडून पसरवली जात आहे, तर दुसरीकडे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ज्योतिषाचा सल्ला मागण्यात आला, असेही चुकीचे चित्र त्यातून निर्माण होत आहे.
तपास योग्य दिशेने :
दाभोलकर यांच्या हत्येबाबत काही धागेदोरे हाती लागले असून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आमचे काम सुरू आहे आणि तपास योग्य दिशेवर आहे. कोणाला अटक करण्यापर्यंत अद्याप पुरावा हाती आलेला नाही. मात्र, लवकरच या गुन्ह्य़ाचा तपास लावण्यात आम्हाला यश मिळेल, असा विश्वास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा