शरद पवार यांची कार्यकर्त्यांना सूचना

बीड : लोकसभा मतदानाच्या दिवशी मतदान यंत्र तपासा, सरकार काहीही करू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहून मतदान यंत्रात काही गडबड तर नाही ना, हे पाहावे. काही आक्षेपार्ह वाटले तर तत्काळ तक्रार करा, अशा सूचना देत बीडसाठी योग्य आणि भारदस्त उमेदवार दिला जाईल. गटतट विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, विजय निश्चित होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

बीड राष्ट्रवादी भवनात शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजता शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र समित्यांचा आढावा घेत चर्चा केली. त्यानंतर खासदार पवार यांनी संवाद साधला. भाजपचे सरकार काहीही करू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर सतर्क राहावे. मतदान यंत्रात गडबड होत असेल, तर तत्काळ आक्षेप नोंदवावा, अशा सूचना दिल्या. दुष्काळी परिस्थितीत सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाला मदत करावी. जिल्ह्याने राष्ट्रवादीवर व माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे. त्यामुळे लवकरच योग्य आणि भारदस्त उमेदवार दिला जाईल. गटतट विसरून एकजुटीने कामाला लागा. विजय निश्चित होईल असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार अमरसिंह पंडित, उषा दराडे, सय्यद सलीम, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.