महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तळेरे येथे विजयालक्ष्मी विशवनाथ दळवी महाविद्यालयाच्या मॉडेल कॉलेजचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्थानिक आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे राणेंचे कट्टर विरोधक आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच कोश्यारींनी नितेश यांचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं. मुंबईसंदर्भात कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणेंनी राज्यापालांची बाजू घेतली होती. त्याचा संदर्भ सध्या राज्यपालांनी केलेल्या कौतुकाशी जोडला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंधुदुर्गमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आदी उपस्थित होते. या कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर भाषणाची सुरुवात करतानाच राज्यपालांनी नितेश राणेंचं कौतुक केलं. व्यासपीठावर बसलेल्यां मान्यवरांची नावं घेताना राज्यपाल नितेश राणेंबद्दल, “आपले युवा आमदार” असं म्हणत थांबले. त्यानंतर “कामाचे ही आहेत आणि कामदारही आहेत,” असं म्हणत नितेश राणेंचं कौतुक केलं. पुढे, “कामाचेही आहेत आणि कामदारही आहेत असे नितेश राणे” असं म्हटलं. राज्यपालांनी हे कौतुक केलं तेव्हा नितेश राणेंच्या बाजूची एक खुर्ची सोडून दीपक केसरकर बसले होते.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी २९ जुलै रोजी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये केलं होतं. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळेस बोलताना कोश्यारींनी, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही,” असं विधान केलं होतं.

कोश्यारी यांच्या या वक्तव्यावरुन बराच मोठा वाद निर्माण झालेला. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली असतानाच दुसरीककडे नितेश राणेंनी मात्र कोश्यारींची बाजू घेतली होती. ट्विटरवरुन आपली भूमिका मांडताना नितेश राणेंनी, “राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना मुंबई महानगरपालिकेची कंत्राटं मिळवून दिली? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात,” असा टोला लगावला होता.

मुंबई मनपामध्ये शिवसेना सत्तेत असल्याने राज्यपालांच्या विधानावरुन टीका करणाऱ्या शिवसेनेला नितेश राणेंनी या विधानातून अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केलं होतं. याच पाठिंब्यामुळे आज राज्यपालांनी विशेष शब्दांमध्ये नितेश राणेंचा उल्लेख केला. या वादानंतर राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकरांकडून स्पष्ट केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor bhagat singh koshyari praises bjp mla nitesh rane in front of rival deepak kesarkar rno news scsg