महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाला एकत्रित हजेरी लावली. दरम्यान मराठवाडा विद्यापीठाकडून नितीन गडकरी आणि शरद पवार यांना मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ताचं मोठं जाळं निर्माण केलं आहे, त्यामुळे लोकं त्यांना आता ‘रोडकरी’ म्हणत आहेत, असं विधान कोश्यारी यांनी केलं. दरम्यान, त्यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांनी कृषीमंत्री म्हणून केलेलं काम अभूतपूर्व असल्याचं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा- “शिवाजी जुन्या काळातले आदर्श, मी नव्या…”, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य चर्चेत!
शरद पवारांचं कौतुक करताना कोश्यारी म्हणाले, “मी आता मंचावर बसलो होतो, तेव्हा मी शरद पवारांना विचारलं की, तुम्ही प्राथमिक शिक्षण कुठून घेतलं? तेव्हा मला कळालं तेही माझ्यासारखं जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकले आहेत. आम्हाला पाचवीपर्यंत ‘एबीसीडी’बाबत काहीही माहीत नव्हतं. पण शरद पवारांनी महाराष्ट्रात शेती, ऊस आणि साखर उद्योगात अभूतपूर्व काम केलं आहे. त्यामुळे त्यांना कधी-कधी राग आला तरी ते साखरेपेक्षा गोड राहतात” असं मिश्किल वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे.
दरम्यान, आपल्या भाषणात राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.