सातारा : ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दि. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती राज्यपालांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

अत्याधुनिक निवास व्यवस्था

गुजरातमधील कच्छच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे शंभरहून अधिक टेन्ट्स उभारण्यात येणार आहेत. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद देखील आयोजित करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचे योगदान यावर विशेष सादरीकरण देखील होणार आहे. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वरच्या साबणे रस्ता येथे एक विशेष सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येईल.

या महोत्सवात राज्यातील प्रत्येक भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना घेता येईल. तसेच ४ मे २०२५ रोजी समारोप सोहळ्यापूर्वी महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककला जसे की लावणी, गोंधळ, जागर, नाशिक ढोल इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिला.