वाई: महाबळेश्वर उन्हाळी पर्यटन हंगामासाठी दि २१ मे पासून २५ मेपर्यंत सलग पाच दिवस राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वरला येत आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी वेण्णालेक व परिसरात पाहणी करून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला, यावेळी पालिका अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक हंगामामध्ये होणाऱ्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीची देखील समस्या पर्यटकांसह स्थानिकांना सतावते. तासंतास वाहतूक कोंडी होते. स्थानिक प्रशासनाच्यावतीने याबाबत पावले उचलण्याची मागणी होत आहे. मागील कित्येक वर्षे हंगाम पूर्व नियोजनाची बैठकच झाली नसून पालिका पोलीस महसूल व वनविभाग अशी संयुक्त बैठक झाल्यास समन्वयाने या कोंडीवर उपाय करता येऊ शकतात. उन्हाळी हंगामासाठी १५ जूनपर्यंत सातारा वाहतूक शाखेच्यावतीने १५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिंम यांनी दिली.
हेही वाचा – सांगली : पलूसमधील लक्ष्मी बझारला आग, ४० लाखांचे नुकसान
राज्यपाल रमेश बैस मागील वर्षी आपल्या कुटुंबासह येथे पर्यटनास आले होते. यावेळी २१ मेपासून २५ मेपर्यंत राज्यपालांचा महाबळेश्वर दौरा असणार असून याची तयारी जिल्हाप्रशासनाकडून सुरु आहे. राजभवन येथे त्याअनुषंगाने युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.