थरांच्या थरथराटासाठी प्रसिद्ध असलेल्या दहीहंडी उत्सवाला पालघरमध्ये गालबोट लागलं आहे, कारण पालघरमधील धनासार काशीपाडा भागात राहणाऱ्या रोहन गोपीनाथ किणी या गोविंदाचा दहीहंडीच्या वरच्या थरावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. रोहन दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर गेला, त्याचवेळी त्याला फिट आली आणि तो खाली कोसळून जखमी झाला. इतर गोविंदांनी रोहनला तातडीनं रूग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहन वरच्या थरावर गेला असताना त्याला चक्कर आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. रोहन किणी या गोविंदाचा मृत्यू झाल्याचं वृत्त पालघर आणि इतर भागांमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून लगेचच पसरलं. या घटनेमुळे पालघरमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.

दहीहंडीच्या दिवशी गोविंदांच्या उत्साहाला उधाण येतं, उंचच उंच थर लावून गोविंदा दहीहंडी फोडण्याचं आव्हान पेलत असतात. अशात अनेक गोविंदा जखमीही होतात. मात्र पालघरमध्ये रोहन किणी या गोविंदाचा मृत्यू झाल्यानं शोककळा पसरली आहे. दिवसभर या गोविंदाचा पालघरमध्ये जल्लोष सुरू होता मात्र आता या घटनेमुळे सगळ्यांचाच उत्साह मावळला आहे.

महाराष्ट्रातल्या मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक दिसून येतो, मात्र यावर्षी हा उत्साह काहीसा कमी झालेला बघायला मिळाला. बक्षीसांच्या रकमांवरही जीएसटीचं सावट दिसून आलं आहे. अशात आता पालघरमध्ये रोहन किणी या गोविंदाचा वरच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यामुळे या उत्सवाला गालबोट लागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda dies after falling from the top of dahihandi in palghar