जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मंगळवारी शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारकडून तुमच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, अशा आशयाचं आश्वासनही भिडे यांनी दिलं.
या घटनाक्रमानंतर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संभाजी भिडे यांना सुपारी दिली आहे, असा आरोप शरद कोळी यांनी केला. ते सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “एका बड्या नेत्याचं…”, ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
संभाजी भिडे यांनी आंदोलनस्थळी दिलेल्या भेटीवर भाष्य करताना शरद कोळी म्हणाले, “खरं तर, आंदोलन कसं करावं? याचा आदर्श मनोज जरांगे पाटील यांनी घालून दिला आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकार अस्वस्थ झालं आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संभाजी भिंडेंना सुपारी दिली आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी संभाजी भिडे आंदोलनस्थळी पोहचले होते.”
हेही वाचा- सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”
“संभाजी भिंडेंना मराठा बांधवांचा इतका पुळका आला असेल किंवा आंदोलनाची काळजी होती, तर १५ दिवस कुठे गायब झाला होतात? तेव्हा आंदोलन दिसलं नाही का? तेव्हा तुम्हाला मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत का?” असे सवालही शरद कोळी यांनी विचारले.
हेही वाचा- “ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोर्टात गेले”, रोहित पवारांचा गंभीर आरोप
संभाजी भिडेंना उद्देशून शरद कोळी पुढे म्हणाले, “आंदोलनाची हवा काढून ते आंदोलन पंक्चर करण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. भाजपाने तुम्हाला सुपारी दिली आहे. म्हणूनच तुम्ही पुढाकार घेत आहात. पण मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा समुदायासह सर्व जाती-धर्माच्या लोकांचा कणा आहेत. ते मोडेन पण वाकणार नाही, अशा स्वभावाचे आहेत. तुमच्यासारख्या कित्येक जणांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला तरी हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय जरांगे पाटील स्वस्थ बसणार नाहीत.”