पिण्याचे पाणी राखून ठेवल्यानंतर जायकवाडीच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी किमान दोन आर्वतने देता येतील एवढे, म्हणजे साधारणपणे साडेनऊ अब्जघनफूट (टीएमसी) पाणी वरील धरणांमधून देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सोमवारी जाहीर केला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी कशी व केव्हा होईल, हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले.
नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी जलाशयात पाणी सोडता येऊ शकेल काय याची चाचपणी, तसेच गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आर्वतन देण्याचे ठरले आहे. जशी गरज लागेल तसे उपलब्ध करून घेऊ, असे ते म्हणाले. तसेच कोणत्या प्रकल्पातून किती व कोणत्या तारखेला पाणी सोडायचे याचा अभ्यास करण्यास अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, हा निर्णय जाहीर होताच औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
जायकवाडी लाभक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून पाणी देण्यात आले नव्हते. या वेळी किमान दोन आर्वतने होतील एवढे पाणी उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. त्यामुळे सुमारे ६२ हजार हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. ऊध्र्व गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी हि. ता. मेंढीगिरी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या छाननीचे काम सुरू आहे. या अनुषंगाने तीन बठका घेतल्याचेही तटकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भुवया उंचावणारा निर्णय
तत्पूर्वी औरंगाबाद तालुक्यातील फुलंब्री येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे, अशी भूमिका घेण्याचे आदेशित केल्याचे सांगितले. हा निर्णय विभागाने घेतला आहे. यात मी कोठे नाही, असे सांगत त्यांनी नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसमोर झालेली हक्काच्या पाण्याची घोषणाबाजी, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भाषणात रविवारी एका कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर तटकरे यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचवायला लावणारा आहे.
सध्या जायकवाडीत ३३ टक्के पाणीसाठा आहे. त्यातून एका वेळेला १२८ दलघमी पाणी दिले जाणार आहे. हा निर्णय बदलला जाणार नाही.
– सुनील तटकरे, जलसंपदा मंत्री

Story img Loader