जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस दलाची वाहने ग्लोबल पोझिशिनग सिस्टीम प्रणालीने जोडण्यात आली आहे. या सर्व वाहनांवर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कन्ट्रोल रूममधून लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.
जिल्ह्य़ातील पोलीस दल सध्या आधुनिकीकरणाच्या सक्रमण अवस्थेत आहे. पारंपरिक पद्धतींना फाटा देत नवनवीन पद्धती आणि तंत्रज्ञानानी पोलीस दलाचे सक्षमीकरण सध्या केले जात आहे. पोलिसांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी हे प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पेट्रोलिंग करावे लागते.
रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरू आहे का, कुठली गाडी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्वी वायरलेस प्रणालीचा वापर केला जात असे, मात्र यात जिल्हा नियंत्रण कक्षाला चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असायची. याशिवाय एखादा मोठा अपघात अथवा घटना घडली तर तिथे जवळपास पोलिसांचे गस्ती पथक आहे का हे प्रत्यक्ष संपर्क साधून तपासावे लागत होते.
यात खूप वेळ वाया जात होता. त्यामुळे घटनास्थळी गस्ती पथक पोहचण्यास विलंब होत असे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलातील सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याची वाहने, नियंत्रण कक्षाची वाहने आता जीपीएस प्रणालीने जोडण्यात आली आहेत. नियंत्रण कक्षात बसून सर्व पोलीस दलांतील वाहनांवर एकाच वेळी लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. दर १० सेकंदांनी वाहनांचे ठिकाणाची सुधारित माहिती नियंत्रण कक्षास मिळणार आहे. त्यामुळे एखादा अपघात अथवा दुर्घटना झाल्यास घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या वाहनास तातडीने तिथे पाठवणे शक्य होणार आहे.
रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. १२० वाहनांना यंत्रणा बसवणे आणि त्यांची देखभाल करणे अशी जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे, यामुळे पोलीस दलाच्या कारभारात सुसूत्रता येईल आणि पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी व्यक्त केला आहे.