नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आल्यानंतर, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना या जागेसाठी उमेदवारी घोषित केली होती. कारण, सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. या प्रकारामुळे काँग्रेला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना भाजपाने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी मीडियाद्वारे ही बातमी बघत होतो. डॉ. सुधीर तांबे यांचे वक्तव्यंही मी ऐकत होतो. सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ, नेमकं काय झालं त्याची कारणं काय?, या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतरच यावर पक्षपातळीवर चर्चा करून, निश्चितपणे जे काही झालं, त्यावरचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देऊ. भाजपाचे लोक काहीही बोलू शकतात. म्हणून मी सांगतोय की सगळी माहिती घेऊनच आम्ही प्रतिक्रिया देऊ.
आणखी वाचा – फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे
याशिवाय, ते(सत्यजीत तांबे) अपक्ष आहेत. त्यांनी काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुधीर तांबे होते, त्यांनी का अर्ज दाखल केला नाही, याबाबतची सगळी माहिती घेऊनच त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल. ही जी घटना झाली आहे ही काही फार चांगली झालेली नाही. असंही नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
आणखी वाचा – उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा
डॉ. सुधीर तांबे काय म्हणाले? –
“काँग्रेसकडून मी तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळी मी अपक्ष उमेदवार होतो. पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा एक वेगळा मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघातून सत्यजीत तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.” असं सुधीर तांबे म्हणाले आहेत.
“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे”
याचबरोबर, “आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं.” असंही सुधीर तांबे यांनी सांगितलं आहे.