जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या पावसावर खरिपाच्या बियाणे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. कृषि विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही भागात मूग, उडिद, कापूस, मका, कांदा आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.
यंदा पावसाने वेळेवर आगमन केले आहे. हवामान खाते व तज्ज्ञांनी सुरुवातीला वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकरी धास्तावला होता. गेली दोन-तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पावसाने जिल्ह्य़ात दगा दिला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही यंदा बियाणे, खते, किटकनाशके आदीची नोंदणी अंदाज घेतच नोंदवली होती. शेतकऱ्यांनी मशागतपुर्व कामे आटोपत आणली होती व पावसाची प्रतिक्षा सुरु केली होती. पावसाला सुरुवात झाल्याने कृषि निविष्ठांच्या बाजारपेठेला उठाव निर्माण होणार आहे.
मात्र होत असलेला पाऊस विस्तृत स्वरुपाचा नाही. मंडलनिहाय तो कमी अधिक स्वरुपाचा आहे. जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागापेक्षा उत्तरेत पावसाचे प्रमाण कमीच आहे. गेल्या आठवडाभराची पावसाची आकडेवारी पाहिली तर पारनेरमधील सुपा, वाडेगव्हाण, जामखेडमधील आरणगाव, नान्नज, राहुरीतील ब्राम्हणी व देवळालीप्रवरा, नेवाश्यातील घोडेगाव व सोनई, नगरमधील नालेगाव व रुईछत्तीशी, पाथर्डीतील टाकळीमानुर व कोरडगाव, शेवगावमधील चापडगाव, संगमनेरमधील तळेगाव, अकोल्यातील अकोले व शेंडी, श्रीगोंद्यातील काष्टी, चिंभळा, दवदैठण आदी मंडलामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. जुनच्या पहिल्या बारा दिवसांतच सरासरीच्या सात टक्के पाऊस झालेला आहे.
मशागतीची कामे करुन पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. कृषि निविष्ठांच्या दुकानातुन त्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपुर भागातील उस उत्पादकांनी कापुस पेरणीला सुरुवात केली आहे. मुळा कालव्याच्या पट्टय़ातही कापुस लागवड केली जात आहे. पारनेरमधील सुपा, जामखेडमधील नान्नज, जवळा, अरणगाव परिसरात मुग, उडिदच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. कापसाच्या बियाणांचे दर किमान १०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी दराची खात्री करुन व पावती घेऊनच बियाणे खरेदी करावी, असे अवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी हेमंत नलगे यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा