राज्यातील एकूण ७ हजार ७८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असताना, यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सर्वाधिक जागा आम्हीच जिंकल्या असल्याचा दावा केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिथे गड आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथे गड आहेत तिथे त्यांचे उमेदवार आणि काँग्रेसचे गड आहेत, तिथे काँग्रेसेचे उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील आकडेवारी जर आपण पाहिली, तर अधिकृत घोषित झालेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जवळपास १३०० ग्रामपंचायतींवर निवडून आलेला आहे आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष जर धऱले तर जवळपास २६५१ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे.”
हेही वाचा – भाजपा – शिंदे गटाने मिळवलेल्या यशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
याशिवाय, “शिवसेना(शिंदे गट) आणि भाजपा यांचा मिळून साधारणपणे २२०० ते २३०० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकेलाल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील जनतेने साथ दिलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे. त्यामुळे हे लक्षात येतं की दलबदलुंचं राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करूनही आज महाविकास आघाडीचा पराभव हा भाजपा आणि त्यांच्याबरोबरचा शिंदे गट करू शकत नाही. हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झालेलं आहे.”असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
याचबरोबर, “आणखी ग्रामपंचायतींचे निकाल यायचे आहेत. मला खात्री आहे की महाविकास आघाडी आणि भाजपा व शिंदे गटामधील अंतर वाढेल. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला प्राधान्य दिलेलं आहे. महाराष्ट्रातील जनतेचं मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि शिंदे गटाचा पराभव केलेला आहे, हे या आकडेवारीवरून सिद्ध होतं. सर्व जागांचे निकाल जाहीर होण्या अगोदरच त्यांनी एकमेकांना लाडू भरवले आहेत. आम्ही सगळे निकाल जाहीर होण्याची वाट बघणार आहोत. उद्या सर्व निकाल हाती आल्यावर मी अधिकृत आकडेवारी आपल्यासमोर मांडणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानतो.” असं शेवटी जयंत पाटील यांनी सांगितलं.